पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काहीही फी पाठवू नये' असे ते लिहीत. इतक्या दूरवरच्या भागातून काही ओळख व माहिती नसताना त्यांनी आपल्यावर एवढा विश्वास टाकावा याचेच रावसाहेबांना खूप अप्रूप वाटत होते. येणाऱ्या शेतकऱ्यांपेकी सीलिंगच्या मर्यादेच्या आत जमीन असलेले शेतकरीही कमी नव्हते. त्यांना "फॉर्म भरण्याचे कारण नाही" असे स्पष्टपणे सांगून रावसाहेब परत पाठवून देत होते; त्यांची फी घेण्याचाही प्रश्न उद्भवत नव्हता. फॉर्म भरून घेणाऱ्यांसाठीसुद्धा त्यांनी फीची आकारणी पन्नास रुपये अशी सर्वांना सारखीच ठेवली होती. बऱ्याच ठिकाणी यासाठी हजार रुपयांपर्यंत फी आकारली जात होती! इतकेच नाही तर फॉर्म भरण्याचे कारण नसतानादेखील फॉर्म भरून ते दाखल करण्यात येत होते ! सुमारे दोन - तीन महिने रावसाहेबांचे हे काम चालले होते. सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बऱ्याच उशिरापर्यंत ते हे काम करीत बसत. मध्यंतरी कोर्ट- कचेरीत तेवढे थोडावेळ जाऊन यावे लागे. त्यांच्या वकिलीच्या व्यवसायातले हे अभूतपूर्व असे एक पर्व होते. ऑफिसशेजारच्या पॅसेजमध्ये पक्षकार अक्षरशः तीन- चार दिवस थांबून असत. रात्रीही बिचारे तिथेच झोपत. आपला नंबर कधी लागेल याचे त्यांना औत्सुक्य असे. जिल्ह्यातल्या बहुतेक प्रमुख पुढा-यांनी त्यांच्या स्वत:च्या जमिनीचे फॉर्म तर रावसाहेबांकडून भरून घेतलेच, पण त्याशिवाय त्यांच्या अगदी जवळच्या नातेवाइकांनादेखील बोलावून घेऊन त्यांचे फॉर्म रावसाहेबांकडूनच भरून घेतले. इतक्या मोठ्या प्रमाणावर काम मिळाल्यामुळे फी जरी माफक प्रमाणात आकारली तरी त्यांना भरीव आर्थिक लाभ झाला. त्याशिवाय महत्त्वाचा लाभ म्हणजे त्यांची व्यावसायिक प्रतिष्ठा चांगलीच उंचावली. सिलिंग कायद्यासंबंधीचा एक माहितगार वकील म्हणून जवळजवळ महाराष्ट्रभर त्यांचा बोलबाला झाला. या कमाल जमीनधारणा कायद्याचा वामन पाटलांवरही मोठाच परिणाम होणार होता. त्यांची जमीन कायद्यातील मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त होती. शिवाय भाऊ किंवा सज्ञान मुलगा नसल्यामुळे जमिनीचे कुटुंबात वाटपही करता येणार नव्हते. आपली सोन्यासारखी जमीन हातची जाणार या विचाराने त्यांची झोप उडाली. याच जमिनीत एकेकाळी ते सालगडी म्हणून राबले होते. अक्षरशः रक्ताचे पाणी करून त्यांनी ही शेती केली होती. त्यांचे सारे वैभव या शेतीतूनच निर्माण झाले होते. त्यांची तडफड त्यामुळे समजण्यासारखी होती. वामनरावांच्या जमिनीचे सात बाराचे उतारे, खाते उतारे, तसेच इतर सर्व व्यवहाराचे कागद रावसाहेबांकडेच ठेवलेले होते. त्यांची जास्तीत जास्त जमीन वाचवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत एकदा रात्री उशिरापर्यंत बहरलेली वकिली... २४७