पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रजिस्टर करून घेतले. त्यात त्यांच्या अन्नवस्त्रासाठी हयातीपर्यंतची सोय म्हणून अलाहिदा व्यवस्था करत असल्याचेही नमूद केले होते. भाग्ययोग असा, की वामनरावांच्या या सातव्या विवाहाने त्यांना जे असोशीने हवे होते ते दिले; लग्नानंतर वर्षदोनवर्षांतच त्यांना मुलगा झाला. त्यांचा आनंद अगदी गगनात मावेना. मुलाचे नाव त्यांनी ज्ञानेश्वर ठेवले. गावजेवण घातले. साधारण त्याच सुमारास महाराष्ट्रात शेतीसाठी कमाल जमीनधारणा कायदा (लँड सिलिंग अॅक्ट) संमत केला गेला. पाच माणसांच्या एका कुटुंबाला १०८ एकर क्षेत्राची कमाल मर्यादा ठरवण्यात आली. कुटुंबातील माणसांची संख्या पाचपेक्षा अधिक असेल तर त्या प्रमाणात ही मर्यादाही वाढणारी होती. पण जास्तीत जास्त २१६ एकर जमीन एका कुटुंबात ठेवण्याची कायद्यात तरतूद होती. शेतीला बारमाही पाणी आहे, की चारमाही आहे, का केवळ कोरडवाहू शेती आहे याचाही हिशेब कायद्यात केलेला होता. कूळकायदा लागू झाल्यानंतर ज्याप्रमाणे वकिली कामाची लाट आली होती त्याचप्रमाणे कमाल जमीनधारणा कायद्यानंतरही वकिली कामाची लाट आली. ३१ मार्च १९६२ या तारखेच्या आत आपल्या जमिनीची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांनी सादर करावयाची होती. त्यासाठी शासनाने एक फॉर्म (तक्ता) तयार केलेला होता. त्या तक्त्यामध्ये बरेच कॉलम होते. त्याप्रमाणे जमिनीची व कुटुंबातील माणसांची इत्थंभूत माहिती त्यात भरून देण्याची जबाबदारी कब्जेदार शेतकऱ्यावर टाकण्यात आली होती. कायद्याने दिलेल्या मुदतीत फॉर्म भरून सादर न केल्यास अथवा अपुरी अथवा चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास जमीन जप्त करण्याची कायद्यात तरतूद होती. महाराष्ट्रातील पाटपाण्याच्या बागायत भागात तसेच खूप मोठ्या क्षेत्राच्या जमिनी ज्या भागात शेतकऱ्यांनी धारण केलेल्या होत्या त्या भागात या कायद्याने चांगलीच खळबळ उडवून दिली. हा कायदा ४ ऑगस्ट १९५९ या तारखेपासून पूर्वलक्षी दृष्टीने लागू करण्यात आला होता. त्यामुळे मूळ नोंदी त्या सालातल्या गृहीत धरल्या जात. त्यात बऱ्याच जणांच्या बाबतीत युक्त्या प्रयुक्त्यांना वाव असे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे अनेक जिल्ह्यांतून पेन्शनर मंडळींची पत्रे येत. त्यांत त्यांच्या जमिनींचा तपशील असे. फॉर्म कसा भरावा याबाबत त्यांनी सल्ला मागितलेला असे. मराठवाडा, विदर्भ या भागातूनदेखील काही पत्रे आलेली होती. रावसाहेब त्या पत्रांना उत्तरे देऊन त्यांना आवश्यक ते तपशीलवार मार्गदर्शन करीत असत. त्यांच्याकडून फी मिळण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र बहुतेक पत्रांमध्ये "तुमची फी कळवावी, ती मनिऑर्डरने पाठवून देऊ," असा मजकूर असायचा. पत्राच्या उत्तरात 'मला अजुनी चालतोची वाट... २४६