पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वामनरावांचे या दिलाशाने समाधान होईना. कोर्टात केस उभी राहिल्यावर जी बदनामी होईल त्याचीच त्यांना भीती वाटत होती. शेवटी त्या मुलीच्या वडलांचे व रावसाहेबांचेही एक मित्र नानाभाऊ वाघ यांनी मध्यस्थी केली व रावसाहेबांच्या ऑफिसात एक प्रदीर्घ बैठक घेऊन पहाटे तीन वाजता रावसाहेबांनी हे प्रकरण मिटवले. प्रत्येक वेळी कोर्टबाजी करून कटुता निर्माण करण्यापेक्षा अशाप्रकारे प्रकरण मिटवता येत असेल, ज्याला 'आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट' म्हणतात तसा समझोता करता येत असेल, तर रावसाहेब नेहमीच त्याला प्राधान्य देत; अशिलाला उगाचच कोर्टात गुंतवून ठेवायची त्यांची वृत्ती नव्हती. या प्रकरणात आपलीही चूक होतीच, म्हणून वामनरावांनी पंचवीस हजार रुपये मुलीला दिले, पण त्यांची संभाव्य बदनामी टळली याचा आनंद खूप मोठा होता. यानंतर वामनरावांची रावसाहेबांवर पुरती श्रद्धा बसली. प्रत्येक बाबतीत ते रावसाहेबांचा सल्ला घेऊ लागले. बराच जमीनजुमला ते खरेदी करत गेले; लक्ष्मी घरी पाणी भरू लागली. पण मुलगा नाही हा सल मात्र कायम होता. त्यांनी पुन्हा एकदा लग्न करून पाहावे असा सल्ला बऱ्याच नातेवाइकांनी दिला. आश्चर्य म्हणजे त्यांच्या दोन्ही हयात बायकांचाही त्यांनी पुन्हा एकदा लग्न करावे असा आग्रह होता. इतर नातेवाइकांचा आग्रह तसा समजण्यासारखा होता; पण या दोन बायकांनीही त्या आग्रहात सामील व्हावे ही गोष्ट तत्कालीन समाजाच्या एकूण मानसिकतेवर आणि 'मुलगा हवा' हा हव्यास फक्त कुटुंबप्रमुखालाच नव्हे तर महिलांस कट सगळ्या कुटुंबालाच कसा असायचा यावर प्रकाश पाडणारी आहे. खरे तर त्यावेळी द्विभार्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात होता; पण तरीही वामनरावांनी पुनर्विवाह करायला त्या हयात बायकांचीही काही हरकत नव्हती; किंबहुना संमतीच होती. नेहमीप्रमाणे वामनरावांनी साहेबांचाही सल्ला घेतला. रावसाहेबांची परिस्थिती खूपच अवघडल्यासारखी झाली. हा विवाह बेकायदा तर होताच आणि वामनरावांचे उतारवय विचारात घेता नैतिकदृष्ट्याही अयोग्यच वाटत होता. पण सगळ्यांचा आग्रह विचारात घेऊन रावसाहेबांनी विरोध केला नाही. ते म्हणतात, "माझ्या विरोधाचाही थोडीशी अडचण निर्माण होण्यापलीकडे अंतिम उपयोग झाला नसता. दुरावा मात्र निर्माण होऊ शकला असता. तत्त्वनिष्ठा बाजूला ठेऊन मी व्यवहारी मार्गाने गेलो. मला तत्त्वाशी तडजोड करावी लागली, हे तर कबूल केलेच पाहिजे.” लौकरच लग्न झाले. रावसाहेबांचा सहभाग फक्त कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यापुरताच होता. पहिल्या दोन बायकांचे फारकतपत्र तयार करून त्यांनी ते बहरलेली वकिली... २४५