पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सानेगुरुजींनी सांगितलेली रामायणातल्या घामाच्या फुलांची गोष्ट मला आठवली. गांधीजींच्या विचारांतल्या घामाच्या भाकरीचे दर्शन संपतच्या घरात होत होते. भाग्याची उधळण संपतवर होत होती. संपत माझा परममित्र झाला आहे. जणू माझ्या गणगोतातला एक. त्यानंतर एकदा माळेवाडीला एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो आणि आश्चर्यचकितच झालो. संपत त्या सभेचा अध्यक्ष होता. मलाच कृतार्थ वाटले. संपत कृतज्ञ होता." ज्यांच्याशी पुढे आयुष्यभरासाठी संबंध जुळून आले असे दुसरे एक पक्षकार म्हणजे मातापूरचे वामनराव उंडे. सगळ्या श्रीरामपूर तालुक्यात एक नामांकित शेतकरी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची काही कोर्टाची कामे पूर्वी अण्णासाहेबांनी केली होती. अण्णासाहेबांबरोबर त्यांची चांगली मैत्रीही होती. एकदा तर आपल्या परिवारातील एका मुलीचे स्थळही त्यांनी रावसाहेबांसाठी सुचवले होते. त्यावेळी अण्णासाहेबांनी लगेचच रावसाहेबांना समोर बोलावून त्याबद्दल विचारले. पण "मला आत्ताच लग्न करायचं नाही" म्हणत रावसाहेबांनी तडकाफडकी तो विषय संपवला होता. वामन पाटलांचा कारभार खूप मोठा असला तरी मुलगा नाही याचे शल्य त्यांना फार डाचत असे. तशी त्यांची पाच लग्ने झाली होती, पण मुलगा नव्हता. व्हायच्या त्या फक्त मुलीच. काळाच्या ओघात तीन बायका निवर्तल्या; त्यानंतर झालेल्या लग्नाच्या दोन बायका हयात होत्या. त्यातल्या एकीला मूलबाळ नव्हते व दुसरीला फक्त एक मुलगीच होती. मुलगा व्हावा ही आस अपुरीच राहिली होती. त्यासाठी वामनरावांनी पुन्हा लग्न करायचे ठरवले; त्यांचे सहावे लग्न. कोणताही विधी वगैरे न करता केवळ माळ घालून त्यांनी ते लग्न लावले. अर्थात सगळा खटाटोप केवळ मुलगा व्हावा म्हणूनच होता. दुर्दैवाने ही नवरी खूप विक्षिप्त व स्वैर वर्तणुकीची आणि तिने वामनरावांना अगदी सळो पळो करून सोडले. एक दिवस वामनराव कोर्टाकडून मिळालेले समन्स घेऊन रावसाहेबांकडे आले. अन्नवस्त्रासाठी तिने वामनरावांविरुद्ध कोर्टात केस दाखल केली होती. केसमध्ये असेही नमूद झाले होते, की तिला एक तान्ही मुलगी होती. वामनराव पुरते हादरून गेले होते. "घाबरू नका, आपण ही केस उत्तम लढवू शकू," असा रावसाहेबांनी दिलासा दिला. कायदेशीरदृष्ट्या हिंदू पद्धतीनुसार हा विवाह झालेलाच नव्हता; शिवाय वामनरावांच्या तीन बायका होत्या व त्यांच्याबरोबर नांदतही होत्या. 'ही वामन पाटलांची बायको नाहीच; कोणीतरी उपटसुंभ पैसे लुबाडण्याच्या हेतूने पुढे आली आहे,' या मुद्दयावर केस लढवणे सहज शक्य होते. पण अजुनी चालतोची वाट... २४४