पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्पन्न तो सावकार घेऊन जात असे. अतिशय कष्टाने संपत शेती पिकवायचा. मूळचा तो माळेवाडीचा नव्हता; वारसाहक्काने ही जमीन त्याला कसायला मिळाली होती. दिवसरात्र शेतात राबायचे एवढेच त्याला माहिती. गावात त्याचा फारसा कोणाशी संबंधच नव्हता. दरवर्षी इमानेइतबारे तो निम्मा वाटा सावकाराला देत असे. निरक्षर असल्याने मालकीहक्काच्या कागदपत्रांची वगैरे त्याला काहीच माहिती नव्हती. कूळ म्हणून त्याचे नाव कुठेही लागलेले नव्हते. आता एकाएकी सावकाराने जमिनीचा ताबा मागितल्यामुळे त्याची हबेलहंडी उडाली होती. सात बाराचा उतारा व इतर सर्व कागदपत्रे सावकाराच्याच नावाने होते. त्यामुळे कोर्टात गेल्यावर निकाल सावकाराच्याच बाजूने लागणार हे अगदी उघड होते. पण तरीही संपतची खूप दया आल्याने रावसाहेबांनी या प्रकरणात लक्ष घालायचे ठरवले. घरात कानाकोपऱ्यात जेवढ्या म्हणून चिठ्या चिटोऱ्या सापडतील त्या सगळ्या घेऊन यायला त्यांनी संपतला सांगितले. त्यानुसार एक दिवस संपत गाठोडेभर कागदपत्रे घेऊन आला. प्रचंड वेळ खर्च करून रावसाहेबांनी त्यांतला प्रत्येक कागद पडताळून पाहिला. त्यात योगायोगाने एक पोस्टकार्ड सापडले. जमिनीत कोणती पिके घ्यावीत याच्या सूचना सावकाराने त्यात केल्या होत्या. शिवाय, "माझ्या बटाईचा निम्मा हिस्सा काढून ठेवावा, तसेच उता-याला व सात बाराला तुझी नोंद न लावता माझी नोंद लावून घ्यावी, " अशीही सूचना या पोस्टकार्डावर होती. जमीन महसुलाच्या पट्टीच्या तीन-चार पावत्याही त्या गाठोड्यात सापडल्या. त्या पावत्यांवर 'हस्ते संपत लखू' अशा नोंदी होत्या. नशिबाने हे दोन भक्कम पुरावे रावसाहेबांना सापडले व मुख्यतः त्यांच्याच आधारावर केसचा निकाल संपतच्या बाजूने लागला. जी जमीन आपल्या मालकीची होईल असे स्वप्नातही कधी त्याला वाटले नव्हते ती आता कायद्याने त्याच्या मालकीची झाली होती. या प्रकरणात रावसाहेबांनी संपतकडून एक रुपयाचीदेखील फी घेतली नाही, हे इथे मुद्दाम नमूद करायला हवे. उलट एकदा श्रीरामपूरहून माळेवाडीला परत जायला संपतकडे बसभाड्यापुरते पाच रुपयेही नव्हते त्यावेळी रावसाहेबांनी स्वत:च त्याला खर्चासाठी म्हणून पन्नास रुपये दिले होते. ही आठवण सांगताना आजही संपतच्या डोळ्यांत पाणी उभे राहते. माळेवाडी शिवार पुढे बागायती झाले. उसाचे भरपूर पीक निघू लागले. संपतने व त्याच्या मुलासुनांनी प्रचंड काबाडकष्ट घेतले. आज माळेवाडीमधला तो सर्वांत मोठा शेतकरी मानला जातो. रावसाहेब म्हणतात, "एका प्रसंगी संपतकडे गेलो तर त्याची चारीही मुले शेणखताचा उकिरडा उपसण्याचे काम करत होती. ते सर्व जण घामाघूम झालेले होते. घरातली बायामाणसे त्यांना मदत करत होती. बहरलेली वकिली... २४३