पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाडेकरू गब्बर अशी परिस्थिती खूप ठिकाणी निर्माण झाली. अनेक ठिकाणी आजही हीच परिस्थिती कायम आहे. यातूनच मुंबईत 'पागडी' सिस्टिम निर्माण झाली. भाडेकरूला आपली जागा प्रचंड किंमत देणारे गि-हाईक असूनही कायद्याने विकता येत नाही; म्हणून मग जागा विकायची याचाच अर्थ, आपल्या नावावरची भाडेपावती नव्या मालकाच्या नावे ट्रान्स्फर करून देणे, असा बनला; व त्या ट्रान्स्फरपोटी इमारतीच्या मालकाने विक्रीची जी किंमत असेल त्यातले एक तृतीयांश किंवा निम्मे पैसे स्वतः घ्यायचे, अशी ही 'पागडी' पद्धत ठरून गेली. हजारो फ्लॅट्स याच पद्धतीने विकले गेले व आजही विकले जातात. हा सर्व व्यवहार रोखीचा असल्याने फ्लॅट विकणारा व विकत घेणारा हे दोघेही काळा पैसा निर्माण करत होते व आजही करतात. प्रचंड प्रमाणावर होणाऱ्या भ्रष्टाचाराचा, बेहिशेबी संपत्तीचा हा एक राजमार्गच बनून गेला. अक्षरश: कायद्याच्या परिभाषेत मात्र 'भाडेकरू' ('टेनन्ट') व 'इमारत मालक' ('लँडलॉर्ड' ) हेच शब्द रूढ झाले व एकूण समाजाच्या जाणीवविश्वातही 'भाडेकरू' हा गरीब बिचारा आणि 'इमारत मालक' हा ऐदी धनदांडगा हाच अर्थ स्थिरावला. मुळात चांगल्या उद्देशाने केलेल्या कायद्याचा प्रत्यक्ष व्यवहारात कसा विपर्यास होऊ शकतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. श्रीरामपुरातली कूळकायद्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही काहीशी अशीच होती. जमीन मालक (लँडलॉर्ड) हेच खूपदा अन्यायग्रस्त होते आणि जमीन कसणारे बडे बागाइतदार (टिलर किंवा टेनन्ट) हे मात्र कायद्यामुळे लाभधारक ठरणारे होते. 'लँडलॉर्ड' आणि 'टेनन्ट' या शब्दांमागचा ध्वनित अर्थच इथे पालटलेला होता. 'लीगल जस्टिस' आणि 'मॉरल जस्टिस' यांच्यातला फरक जाणण्याची संवेदनशीलता आणि सत्यनिष्ठा रावसाहेबांपाशी होती. त्यांच्या काही पक्षकारांचे अनुभव नमुन्यादाखल या संदर्भात अभ्यासण्याजोगे आहेत. उदाहरणार्थ, संपत लखू तारडे हा श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी गावचा शेतकरी. १९६०च्या सुमारास अतिशय भेदरलेल्या अवस्थेत हा तरुण रावसाहेबांच्या ऑफिसात आला. जमीन खाली करून मागणारी जमीन मालकाची नोटीस त्याला आली होती. हा जमीनमालक म्हणजे जळगावचा एक सावकार होता. मूळ जमीनमालक कोणीतरी संपतच्याच नातेवाइकांचा पूर्वज होता व त्याने ती जमीन गहाण ठेवून जळगावच्या एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडता न आल्याने ती जमीन आता सावकाराच्या नावे झाली होती. दरवर्षी शेतीचे निम्मे अजुनी चालतोची वाट... २४२