पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वकिली व्यवसायात घालवलेली तीस-पस्तीस वर्षे ही अशीच वकिलीच्या विधायक बाजूची साक्ष पटवणारी आहेत. अंगभूत हुशारी, अन्य व्यवधाने बाजूला सारून वकिलीवरच एकवटलेले लक्ष, प्रचंड मेहनत, अण्णाभाऊंचे उत्तेजन, श्रीरामपुरात नुकतेच दिवाणी कोर्ट सुरू झालेले असल्यामुळे व्यवसायवृद्धीसाठी असलेला वाव आणि कुळकायद्याच्या अंमलबजावणीमुळे एकाएकी उद्भवलेले असंख्य दावे अशा सहा मुख्य कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे रावसाहेबांची बहरलेली वकिली. हा बहर फक्त त्यांना स्वतःपुरती समृद्धीची फळे देणारा नव्हता; अन्यायग्रस्तांना दिलासा देण्याचे मोठे कामही याच व्यवसायाद्वारे त्यांना करता आले, पण त्यांच्या वकिलीचा हा समाजाभिमुख आविष्कार स्पष्टपणे दृगोचर व्हायलाही काही वर्षे जावी लागली. ही काही वर्षे म्हणजे भविष्यकाळाची पायाभरणीच होती. कूळकायदा आल्यानंतरच्या काळात, म्हणजे १९५६नंतर, रावसाहेबांकडे येणाऱ्या पक्षकारांची संख्या, विश्वास बसणार नाही इतकी वाढली. एक वकील म्हणून जी कामे करायला हवीत ती सर्व कामे ते अत्यंत काटेकोरपणे व जराही कंटाळा वा चालढकल न करता करत. प्रत्यक्ष केसचा अभ्यास तर करावाच लागे, पण त्याशिवाय पक्षकाराने व त्याच्या बाजूने येणाऱ्या साक्षीदारांनी कोर्टापुढे योग्य जबाब कसा द्यावा याची त्यांच्याकडून पूर्वतयारीही करून घ्यावी लागे. त्यासाठी प्रचंड वेळ द्यावा लागे. हाती उपलब्ध असलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी करणे, त्यातले संदर्भ लक्षात राहण्यासाठी स्वतंत्र नोंदवून ठेवणे हाही मोठाच व्याप असे. बाँबे लॉ जर्नल आणि ऑल इंडिया लॉ रिपोर्टर या कायदेविषयक नियतकालिकांचे ते वर्गणीदार बनले. पुण्यात अप्पा बळवंत चौकात फक्त कायद्याची पुस्तके विकणारे एक दुकान होते. कुठल्याही कारणाने पुण्याला येणे झाले, की तिथून बॅग भरून पुस्तके ते विकत घेत. कायद्याच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्या निघाल्या, की त्या श्रीरामपूरला टपाल करायची विक्रेत्याला कायम सूचना असे. अशा वेळी ते पैशाकडे पाहत नसत. ही पुस्तके ठेवण्यासाठी उत्तम सागवानी लाकडाची तीन- चार मोठी कपाटे त्यांनी बनवून घेतली होती. या सगळ्या वाचनामुळे त्यांचे कायद्याचे व त्यातील नवनवीन तरतुदींचे ज्ञान अद्ययावत राहू लागले. या सगळ्यामध्ये अर्थातच वेळ खूप जाई. खूपदा रात्री घरी गेल्यावर जेवायला बसले की रावसाहेब म्हणत, "आज इतकी भूक का लागली आहे, कोण जाणे!" मग पत्नी शशिकलाताई आठवण करून द्यायच्या, "अहो, दुपारी जेवलातच कुठे तुम्ही?” मग रावसाहेबांच्या लक्षात यायचे, की आज दुपारी न जेवता आपण तसेच कोर्टात गेलो होतो ! आठवड्यातून दोन तीन वेळा तरी असा प्रसंग अजुनी चालतोची वाट... २४०