पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बहरलेली वकिली आपल्या समाजात काही काही व्यवसायांना परंपरेनेच मानाचे स्थान दिलेले आहे. उदाहरणार्थ, शिक्षक हा विद्यादान करतो, सर्वांत पवित्र असे काम करतो, म्हणून गुरू साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनम: अशी शिकवण आपल्याला लहानपणापासूनच दिली जाते; आई-वडिलांच्या खालोखाल गुरूला मानले जाते. डॉक्टरलाही परंपरेने असेच मानाचे स्थान दिले आहे. डॉक्टर आपल्याला जीवनदान देतो; त्यामुळे त्याचे काम म्हणजे सेवाधर्म मानले जाते; अगदी परवापरवापर्यंत डॉक्टर घरी व्हिजिटसाठी आले, की घरची कोणीतरी व्यक्ती त्यांच्या हातातली बॅग तत्परतेने उचलून घेई. अशीच प्रतिष्ठा लेखक-कलावंतांनाही आपल्या समाजात मिळत आलेली आहे. पण का कोण जाणे, महात्मा गांधींपासून आपले अनेक नेते वकिलीचे शिक्षण घेतलेले होते तरीही एकूण वकिली व्यवसायाला मात्र आपल्या समाजात ती प्रतिष्ठा फारशी काही लाभल्याचे दिसत नाही. उलट वकील म्हणजे ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणारा, खऱ्याचे खोटे करून दाखवणारा, आपल्या बुद्धिचातुर्याचा उपयोग करून धनदांडग्यांना मोठमोठ्या गुन्ह्यांतून सोडवणारा, सर्वसामान्य पक्षकारांना लुबाडणारा अशीच काहीशी प्रतिमा समाजात प्रचलित आहे. आपल्याकडील कोर्टामध्ये गुन्हेगारांना सजा ठोठावली जायचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे व भ्रष्टाचार करणारेही उजळ माथ्याने वावरताना सर्रास दिसतात; आणि याउलट गरिबांना मात्र न्याय मिळत नाही, हे वास्तवही वकिलांविषयीच्या अप्रीतीला काही अंशी कारणीभूत आहे. 'कायदा गाढव असतो' किंवा 'कायदा आंधळा असतो' असे म्हटले जाते ते बहुधा त्याचमुळे. अर्थात हेही तेवढेच खरे आहे, की समाजातील अन्याय दूर करण्याचे, वंचितांना- पीडितांना आधार देण्याचेही वकिली हे एक प्रभावी माध्यम आहे. रावसाहेबांनी बहरलेली वकिली... २३९