पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मासिक स्थगित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. 'आम्ही तूर्त आपला निरोप घेत आहोत' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात अण्णासाहेब म्हणतात, "सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञांचा संच जमवून अतिशय उच्च दर्जाचे साहित्य देणारे असे हे मासिक चालवावे अशी आमची कल्पना होती. तथापि त्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ उभे करण्याच्या प्रयत्नात आम्हांला यश आले नाही. तरीसुद्धा हे मासिक चालू ठेवण्याच्या दृष्टीने आमचे अनेक हितचिंतक आणि विचारवंतांनी आम्हांला मदत केली. त्यांचे आम्ही व महाराष्ट्र पशुसंवर्धक संघटना ऋणी आहोत.” 'श्वेतक्रांती' सारखे एखादे मासिक सुरू करणे, स्वतःचा वेळ व श्रम देऊन ते चालवणे आणि नंतर शालीनतापूर्वक बंद करणे यातूनही अण्णासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश पडतो. आयुष्यभर समाजासाठी इतके योगदान दिलेले आणि केंद्रात पंधरा वर्षे मंत्री राहिलेले अण्णासाहेब एक मराठी मासिक चालवण्याइतके पैसेही उभारू शकले नाहीत यातून आपल्या समाजाचे करंटेपण तर दिसतेच, पण अण्णासाहेब किती भ्रष्टाचारमुक्त आणि निर्मळ आयुष्य जगत होते हेही दिसते. सहकारी साखर कारखाना हे ग्रामीण भागातील परिवर्तनाचे केंद्र बनू शकते अशी अण्णासाहेबांची श्रद्धा होती. महाराष्ट्रातल्या साधारण ६०-६५ सहकारी कारखान्यांना शिफारस व परवाना मिळवणे, कारखान्याची उभारणी करणे आणि तो वाढवणे या सर्वच बाबतीत अण्णासाहेबांनी मोलाचे सहकार्य दिले होते. एकदा तर बारा सहकारी साखर कारखान्यांचे अर्ज मार्गी लावून सरकारतर्फे त्यांना दिली जाणारी इरादा पत्रे ते स्वतः दिल्लीहून घेऊन आले आणि औरंगाबाद येथे एका जाहीर समारंभात त्यांनी ती पत्रे त्या-त्या प्रवर्तकांना दिली होती. त्यात बरीच वर्षे रेंगाळलेला आप्पासाहेब सा. रे. पाटील यांच्या शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचाही परवाना होत आपले विचार स्पष्ट करण्यासाठी अण्णासाहेबांनी एकूण चार पुस्तके लिहिली. कृषिमंत्रालयात काम करताना सुरुवातीसच अण्णासाहेबांनी आपल्या विषयाचा सखोल अभ्यास केला आणि त्याचे सार म्हणून एक छोटासा प्रबंध लिहिला. 'भारतापुढील कृषिसमस्या व अन्नसमस्या' या नावाने हा प्रबंध जून १९६५ मध्ये प्रकाशित झाला. हे त्यांचे पहिले पुस्तक. त्याचे प्रकाशक म्हणून शरच्चंद्र पवार, नवयुवक प्रकाशन, यांचे नाव आहे. त्यांचेही हे पहिलेच पुस्तक. आपल्या निवेदनात श्री. शरद पवार यांनी म्हटले आहे, "संस्थेचे प्रथम पुष्प म्हणून खासदार अण्णासाहेब शिंदे यांचे हे पुस्तक प्रसिद्ध करताना आनंद होत आहे. अशा अजुनी चालतोची वाट... २३६