पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जाणाऱ्या पुढाऱ्यांची मजल गेली. त्यामुळे वैचारिक गुलामगिरी वाढून राष्ट्र अधिकच शक्तिहीन झाले. शिक्षणामुळे अंधश्रद्धा कमी होईल असे वाटत होते, परंतु शिर्डीचे साईबाबा, दुसरे सत्यसाईबाबा, आचार्य रजनीश इत्यादींच्या भोवती होणारी तथाकथित शिक्षित व राजकारणी मंडळींची होणारी गर्दी पाहिली म्हणजे देशाच्या भवितव्याबद्दल चिंता वाटू लागते. " "मुस्लिम पुराणमतवादी आणि प्रतिगामी विचारांचे हिंदुत्वनिष्ठ म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत" असे सांगून अण्णासाहेबांनी अशी हळहळ व्यक्त केली, की भारतीय समाज विज्ञाननिष्ठ, बलशाली आणि आधुनिक बनावा म्हणून प्रखर दृष्टीने हिंदू धर्मातील गुणदोषांवर प्रकाश टाकणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे हिंदुत्वनिष्ठ आज आढळून येत नाहीत. दूध हे बव्हंशी पूर्णान्न असल्याने देशातील कुपोषणावर मात करण्यासाठी दुग्धोत्पादन वाढायलाच हवे ही त्यांची श्रद्धा होती. त्याच दृष्टीने त्यांनी श्वेतक्रांती नावाचे एक मासिकही दोन-तीन वर्षे चालवले होते. पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या 'श्वेतक्रांती' मासिकाचे बरेचसे काम 'बळिराजा' हे शेतकऱ्यांसाठीचे मासिक अनेक वर्षे चालवणारे प्र. बा. भोसले हे सांभाळत तर अण्णासाहेब संपादकीय लिहीत. भोसले यांची परिस्थिती त्याकाळी बेताचीच होती, पण काम करणाच्या माणसाच्या बाबतीत अण्णासाहेब कधी उच्चनीच बघत नसत. पुण्याला आले, की भोसले यांच्या कार्यालयात ते नेहमी जात आणि तिथल्या एका साध्या बाकड्यावर बसून अंकाबद्दल तासन्तास चर्चा करत. पुढे १९९२ साली वसंतराव नाईक प्रतिष्ठानतर्फे 'बळिराजा' मासिकाला उत्कृष्ट कृषिसाहित्याचा पुरस्कार मिळाला. या प्रतिष्ठानपर्यंत आपले नाव कसे गेले याचा भोसले यांना अचंबा वाटला आणि अण्णासाहेबांनीच आपल्याबद्दल सांगित असावे असे त्यांना वाटले. पण साहेबांना याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी प्रांजळपणे म्हटले, "हे काम मी केलेले नाही, अन्य कुणीतरी तुमची शिफारस केली असली पाहिजे." फुकटचा मोठेपणा घेण्याची संधी असून त्यांनी ती घेतली नाही. असा प्रामाणिकपणा दाखवणारी माणसे खूप दुर्मिळच. यामुळे भोसले अधिकच थक्क झाले. अतिशय उपयुक्त अशी माहिती 'श्वेतक्रांती'मधून प्रसिद्ध होत असे. इतके असूनही दोन वर्षांत 'श्वेतक्रांती' बंद करण्याची वेळ आली. डेअरी सोसायट्या व दूध उत्पादक तिचे वर्गणीदार, जाहिरातदार असत. परंतु अंतर्गत फाटाफुटीचा परिणाम मासिकावर झाला. वरकरणी सारेच गोड बोलत, पण आतून एका गटाने जाहिराती देणे बंद केले. वर्गणीदार घटू लागले. अखेर डिसेंबर १९८३नंतर त्वमेव बंधुः सखा त्वमेव... २३५