पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंडळी तिथे चर्चेसाठी येत; अनुभवांची देवाणघेवाण होई. या विज्ञानमंडळाच्या कामातही ज्ञानाचा अहंकार वा कुठलेही अवडंबर नसे. प्रत्येक जण आपापला डबा घेऊन येई आणि जमिनीवर घोंगड्या पसरून सगळ्यांनी बसायचे आणि आणलेले अन्न वाटून खायचे अशीच पद्धत होती. साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी आवर्जून बोध घ्यावा असे खूप काही या विज्ञानमंडळात होते. 'मी केंद्रात मंत्री होतो, मला जास्त कळतं,' अशी भूमिका त्यांनी कधीच घेतली नाही. उलट मंडळात झालेल्या चर्चेचा आपल्या शेतीसाठी त्यांना खूप उपयोग होई. इतरांकडून सतत नवे काहीतरी शिकून घेण्याची नम्रता त्यांच्यात त्या वयातही होती. १९६२ साली दिल्लीला जाईस्तोवर, म्हणजे वयाची चाळीशी उलटेस्तोवर, अण्णासाहेबांनी महाराष्ट्र व गुजरात सोडून कुठेही प्रवास केला नव्हता; त्यांचे तत्कालीन कार्यक्षेत्र नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यांपुरतेच सीमित होते. दिल्लीला जायची व त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर व्यापक असे काम करण्याची सुवर्णसंधी ही त्यांच्या जीवनाला एकदम एका विशाल वर्तुळात घेऊन गेली. देशभर आणि परदेशांतही त्यांचा भरपूर प्रवास झाला, थोरामोठ्यांबरोबर काम करायची संधी मिळाली. तसे ते प्रज्ञावान होतेच; उदाहरणार्थ, सोव्हिएट रशियाचे विघटन होईल, साध्या ब्रेडवरूनही तिथे मारामान्य होतील हे भाकीत त्यांनी त्या अंतः प्रज्ञेच्या बळावरच केले होते. दिल्लीला गेल्यावर या प्रज्ञेला अधिकच झळाळी आली. त्यांची व्याख्याने, वेगवेगळे लेख व चार प्रकाशित पुस्तके त्यांच्या प्रज्ञेची व व्यासंगाची साक्ष पटवणारी आहेत. उदाहरणार्थ, १९८९ साली जपानला भेट दिल्यानंतर त्यांनी लिहिलेली लेखमाला. पाश्चात्त्यांना मागे टाकणाच्या या 'उगवत्या सूर्याच्या देशाने आपली अभूतपूर्व प्रगती कोणत्या गुणांच्या बळावर केली आणि आधुनिक बनतानाच आपल्या परंपरा आणि संस्कृती यांचेही जतन कसे केले याचे विवेचन त्यात केले होते. त्यातील एका लेखाचा मथळा होता, 'हे समजावून घ्यायलाच हवे', तर दुसऱ्या लेखाचे शीर्षक होते, 'आपणही काही शिकणार का ?" या शीर्षकांवरूनच त्यांच्या मांडणीचा केंद्रबिंदू 'भारतातील परिस्थिती कशी सुधारणार' हाच कसा होता हे स्पष्ट होते. ट्युलिप फुलांच्या निर्यातीतून करोडो डॉलर्स दरसाल मिळवणाऱ्या हॉलंडला भेट दिल्यानंतर 'फळांप्रमाणे आता आपण फुलांकडे कसे वळू शकू व फुलांचीही निर्यात कशी करू शकू' यावर त्यांनी लिहिले. विशेष म्हणजे या दौऱ्यात त्यांच्याबरोबर जयसिंगपूरचे आप्पासाहेब सा. रे. पाटील हेही होते आणि पुढे त्यांनी स्वत: उत्तम फुलशेती करून व फुलांची निर्यात करून भरपूर पैसा कसा त्वमेव बंधुः सखा त्वमेव... २३३