पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या हरितक्रांतीच्या आणि श्वेतक्रांतीच्या संदर्भात सी. सुब्रमण्यम, एम. एस. स्वामीनाथन, व्हर्गिस कुरीयन, मणीभाई देसाई अशा महनीय व्यक्तींची नावे घेतली जातात व त्यांचे श्रेय वादातीतच आहे. पण त्यांच्याच जोडीने अण्णासाहेबांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे होते हे नमूद करायला हवे. एम. एस. स्वामीनाथन म्हणतात, "देशाच्या शेतीखात्याला लाभलेले बहुतांश कॅबिनेटमंत्री राजकीय घडामोडींत व्यग्र असत. त्यामुळे कृषिराज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे हेच देशाच्या शेती खात्याचे सर्वार्थाने प्रमुख होते." या कृषिमंत्रालयाच्या मनस्वी सहभागाशिवाय केवळ शास्त्रज्ञ, सनदी अधिकारी आणि समाजकार्यकर्ते यांच्या बळावर हे देशव्यापी परिवर्तन घडून आले नसते. देशातील कृषिक्षेत्राला अशाप्रकारे अण्णासाहेबांनी फार मोलाचे योगदान दिले. त्याची पूर्ण जाणीव ठेवूनच पुढे २०१० साली तत्कालीन कृषिमंत्री शरदराव पवार यांनी नवी दिल्ली येथील विख्यात पुसा इन्स्टिट्यूटमधील भव्य अशा सिंपोसियम हॉलला अण्णासाहेब शिंदे यांचे नाव देऊन त्यांचा गौरव केला. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हा नामकरण समारंभ मोठ्या थाटात पार पडला. १९८० सालची लोकसभा निवडणूक अण्णासाहेब हरले. त्यानंतर राजकारणातून ते जवळजवळ निवृत्तच झाले. महाराष्ट्र इरिगेशन कमिशनचे चेअरमन, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ व नाबार्डचे संचालक अशी काही पदे त्यांनी भूषवली, पण त्यांच्या कारकिर्दीतले सुवर्णयुग तोवर सरलेले होते. आयुष्याच्या त्या सांजपर्वात शेती व सहकार या आपल्या आवडीच्या विषयांना त्यांनी वाहून घेतले होते. बराचसा वेळ ते कोल्हारच्या शेतावर घालवत. धोतर- शर्ट अशा शेतकऱ्याच्या पोशाखात वावरत राहण्यात कुठलाही डामडौल नसायचा. एअरकंडिशनर तर नव्हताच, पण साधी टेबलखुर्चीही नव्हती. लांब पाय पसरून वाचन तरी करत किंवा आपल्या शेतातली व डेअरीतली कामे करत फिरत. घरातच त्यांनी ग्रंथालयही थाटले होते. कृषिविद्यापीठातील व इतरत्रचे अभ्यासक त्यांची शेती बघायला आवर्जून येत. बोकड पाळण्यापासून फळबागा लावण्यापर्यंत अनेक अभिनव उपक्रम त्यांनी आपल्या शेतावर यशस्वीपणे राबवले. त्यांनी एक गोबर गॅस प्लँटही उभारला होता व त्यातून शेतावरील सर्व मजुरांना स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध करून दिला होता. मजुरांना राहण्यासाठी चांगली, पक्की घरेही बांधून दिली. शेतकऱ्यांसाठी श्रीरामपुरात चालवलेल्या एका विज्ञानमंडळात त्यांचा आवर्जून सहभाग असे. आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय भारतीय शेतीला तरणोपाय नाही यावर त्यांची श्रद्धा होती. राहुरी कृषिविद्यापीठातील तज्ज्ञ अजुनी चालतोची वाट... २३२