पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नव्हते. अशा परिस्थितीत सगळी प्रापंचिक जबाबदारी सांभाळून हिराबाईंनी खऱ्या अर्थाने 'सहतेचरामी चे व्रत पाळले. आपल्या नेक आणि स्वच्छ कारभारासाठी अण्णासाहेबांची ख्याती होती. १९६२च्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून येण्यासाठी त्यांनी फक्त साडेबारा हजार रुपये खर्च केले होते. तो सर्व हिशेब रोजच्या रोज रावसाहेब लिहीत असत आणि पुढे कित्येक वर्षे त्यांनी तो हिशेष जपूनही ठेवला होता. आज सत्तेवर असलेले बहुतेक राजकारणी 'पैसे अडवा, पैसे जिरवा' हे धोरण राबवताना दिसतात. अण्णासाहेबांनी मात्र स्वार्थासाठी सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही. मंत्रिपदावर नसतानासुद्धा दिल्लीला गेल्यावर ते महाराष्ट्र सदनात किंवा एखाद्या सरकारी अतिथिगृहात सहज राहू शकले असते. पण अण्णासाहेबांनी ते कधीही केले नाही. आपले मित्र आबासाहेब कुलकर्णी यांच्याकडे ते उतरत असत. पुण्याला आल्यावरही सर्किट हाउसवर न राहता ते स्वखर्चाने पूनम किंवा स्वरूप हॉटेलात उतरत असत. मधु लिमयेंनी म्हटले होते, "भ्रष्टाचारी कोण नाही हे आज दुर्बिणीतून पाहावे लागते. अण्णासाहेब हे मात्र याला अपवाद होते. " अण्णासाहेब समर्पित व निष्कलंक आयुष्य जगले हे कौतुकास्पद आहेच; पण आपल्या कामातील त्यांचे नैपुण्य आणि योगदान हेदेखील तितकेच कौतुकास्पद आहे. १९६२ ते १९७७ अशी सलग पंधरा वर्षे शेतीखात्यात उपमंत्री व राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्याच काळात देशात हरित क्रांती व श्वेतक्रांती घडून आली. पारंपरिक पद्धतीनेच शेती करणाऱ्या भारतीय शेतकऱ्याला संकरित बियाणे, रासायनिक खते, नवी अवजारे हे सारे पटवून देणे सोपे नव्हते. त्यासाठी पाच एकरांचा एक असे एकूण एक हजार प्लॉट्स कृषिमंत्रालयाने देशाच्या कानाकोपऱ्यात तयार केले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून तिथे प्रत्यक्ष लागवड केली. त्यातून पिकामध्ये दुपटीने किंवा तिपटीने होणारी वाढ शेतकऱ्यांनी 'याची देही, याची डोळा' बघितली आणि मगच भारतीय शेतकऱ्यांनी नव्या पद्धतींचा स्वीकार केला. अण्णासाहेब स्वतः अशा प्लॉट्समधून सातत्याने फिरत असत. यातूनच चमत्कार वाटावा अशा वेगाने शेतीमध्ये प्रगती होत गेली. अमेरिकन गहू घेऊन येणारे जहाज बंदराला लागले तरच रेशनच्या दुकानात धान्य उपलब्ध होईल या अवस्थेतून धान्याची परदेशात निर्यात करण्यापर्यंत देशाने मजल गाठली. हाच प्रकार संकरित गाईंच्या व आधुनिक डेअरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत घडला. ज्यांच्याकडे दुधाचे कार्ड आहे अशाच सुदैवी कुटुंबांना अर्धा - एक लिटर दूध मिळायचे अशा अवस्थेतून देशात दुधाचा महापूर आला असे म्हणण्यापर्यंत देशाने मजल गाठली. त्वमेव बंधुः सखा त्वमेव... २३१