पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्योतिर्मय बसू यांनी याबद्दल अण्णासाहेबांची मुक्तकंठाने स्तुती केली. "अण्णासाहेब शिंदे हा मंत्री म्हणजे भारतीय शेतीचा जिताजागता ज्ञानकोश आहे," असे उद्गार त्यांनी काढले. राज्यसभेचे तत्कालीन सभापती आणि उपराष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनीही शेतीखात्याचे कॅबिनेट मंत्री जगजीवनराम यांना बोलावून घेतले व असा व्यासंगी राज्यमंत्री त्यांच्या खात्याला लाभल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतीच्या प्रश्नांची अण्णासाहेबांना मूलभूत जाण होतीच; त्यांनी तिला आपल्या व्यासंगाचीही जोड दिली व त्यामुळेच हाताखाली काम करणाऱ्या जी. आर. कामत यांच्यासारख्या वरिष्ठ आय.सी.एस. अधिकाऱ्यांचा व एम. एस. स्वामीनाथन यांच्यासारख्या ज्येष्ठ शास्त्रत्रांचा आदर ते संपादन करू शकले. दिल्लीत खासदार म्हणून जेव्हा महाराष्ट्रातील नेते जात तेव्हा बहुतेकदा ते आपले बिहाड महाराष्ट्रातच मागे ठेवत; शिवाय सतत महाराष्ट्रावरच लक्ष ठेवून असल्याने दिल्लीत त्यांचे बस्तान नीटसे बसतच नसे. त्यापूर्वीच्या दहा वर्षांत १९५२ ते १९६२ - महाराष्ट्रातील एकाही खासदाराने दिल्लीत स्वतःचे बिहाड हलवले नव्हते. पण अण्णासाहेबांनी मात्र प्रथमपासूनच दिल्लीत सहकुटुंब वास्तव्य करायला सुरुवात केली. पंधरा वर्षे मंत्री म्हणून व नंतर तीन चार वर्षे खासदार म्हणून अशी सलग एकोणीस वर्षे त्यांचे दिल्लीतच वास्तव्य राहिले. त्यांची अशोक, अनिल, दिलीप आणि विजया ही चारी मुले दिल्लीतच शिकली. ग्रामीण पार्श्वभूमीतून आल्यामुळे त्यांना दिल्लीतल्या वातावरणाशी समरस होणे सुरुवातीला जड गेले, पण हळूहळू सगळेच कुटुंब तिथे रुळले. या संदर्भात त्यांच्या पत्नी हिराबाई ऊर्फ आक्का यांचे विशेषच कौतुक करायला हवे. नऊवारी साड्यांऐवजी पाचवारी साड्या नेसण्यापासून ते ताट- वाटी-पाटाऐवजी डायनिंग टेबलवर काचेच्या प्लेटमध्ये काट्या चमच्याने जेवण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट दिल्लीला आल्यावर त्यांना जाणीवपूर्वक शिकावी लागली. नोकरांपासून दुकानदारांपर्यंत सगळ्यांशी इथे हिंदीतच बोलावे लागे. पत्नी आणि मुले यांना हिंदी व इंग्रजीचा सराव व्हावा म्हणून अण्णासाहेबांनी खास शिकवण्याही ठेवल्या. हिंदी-इंग्रजी नीटसे येत नसल्याने भोवतालची मुलेही हिराबाईंच्या मुलांना खेळताना बरोबर घेत नसत. गोडीगुलाबीने, गोळ्या - बिस्किटे देऊन मीना बागेतील त्या इतर मुलांचे मन जिंकावे लागे. महाराष्ट्रातून येणाऱ्या व खूपदा अण्णासाहेबांच्या घरीच मुक्काम ठोकणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागे. मंत्रिपदाच्या व्यापामुळे अण्णासाहेबांना ह्या सगळ्यात लक्ष घालणे शक्य अजुनी चालतोची वाट... २३०