पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढे इंडिकेट बहुमतात आहे हे दिसून आल्यावर ते पुन्हा इंदिराजींकडे आले. पुढे जनता पक्षाचे सरकार कोसळल्यावर चरणसिंग पंतप्रधान बनले त्यावेळी ते चरणसिंगांच्या हाताखाली उपपंतप्रधान बनले, पण थोड्याच महिन्यांनंतर चरणसिंग मंत्रिमंडळ कोसळल्यावर ते पुन्हा 'स्वगृही' म्हणजेच काँग्रेसमध्ये परतले. या सगळ्या घडामोडींमध्ये साहजिकच अण्णासाहेबांचीही बरीच ससेहोलपट झाली. १९६९नंतर यशवंतरावांची साथ न सोडल्यामुळेच अण्णासाहेब इंदिराजींच्या मर्जीतून उतरले. त्यामुळे अन्न व शेती खात्यात असूनही साखर विभाग त्यांच्या हाती दिला गेला नाही; साखर कारखान्यांशी त्यांचा नित्याचा संबंध राहू नये व त्या माध्यमातून त्यांना आपली सत्तास्थाने निर्माण करता येऊ नयेत म्हणून त्यांचे परदेश दौरेही शक्य तितके कमी केले गेले. शेतीखात्यात ते पंधरा वर्षे सलग राहिले; आधी उपमंत्री म्हणून व पुढे राज्यमंत्री म्हणून. पण कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मात्र त्यांना कधीच दिला गेला नाही. याबद्दलचे असमाधान अण्णासाहेबांच्या मनात असणारच, पण त्यांनी त्याची कुठे फारशी वाच्यता केल्याचे ऐकिवात नाही. तसे ते भावनाप्रधान होते; कोणावरही अन्याय झालेला त्यांना सहन होत नसे, लगेच ते त्याविरुद्ध आवाज उठवत. पण स्वत:वरील अन्यायाच्या बाबतीत मात्र त्यांनी मौन पाळणेच पसंत केले. मनाविरुद्ध झालेल्या अनेक गोष्टी त्यांना सोसाव्या लागल्या. आणीबाणीला त्यांचा विरोध होता, पण उघडपणे ते काही बोलू शकत नव्हते. पण या सगळ्याचा अण्णासाहेबांनी आपल्या कामावर मात्र परिणाम होऊ दिला नाही. दिल्लीतल्या अन्य मराठी नेत्यांप्रमाणे ते फक्त मराठी लोकांच्या घोळक्यांमध्ये रमत नसत; प्रांतोप्रांतीच्या नेत्यांमध्ये त्यांची ऊठबस असे. तसेच आवश्यक तो सगळा अभ्यास करून ते आपल्या विषयाची खोलात जाऊन माहिती करून घेत. चनाची तर त्यांना आवड होतीच, पण सर्व उपयुक्त माहितीची टिपणे काढण्याची व ती संदर्भासाठी कधीही सापडतील अशा बेताने ठेवण्याची त्यांची सवय होती. त्यामुळे संसदेत त्यांना मानाचे स्थान होते. राज्यसभेत एकदा अन्नधान्याच्या, साखरेच्या व दुधाच्या तुटवड्याबाबत प्रश्न विचारले जात होते. विषय सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा होता. पूर्वसूचना न दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे अशावेळी बंधनकारक नसे. 'मला चौकशी करावी लागेल, संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागेल,' असे काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन अवघड प्रश्नांना बगल देण्याचा बहुतेक मंत्र्यांचा शिरस्ता असे. पण अण्णासाहेब प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर, कुठल्याही मदतनिसाला न विचारता, न अडखळता देऊ लागले. शेवटी तासाभराने ही प्रश्नांची सरबत्ती संपली. प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये आघाडीवर असलेले कॉ. त्वमेव बंधुः सखा त्वमेव... २२९