पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक उद्दिष्ट आहे आणि न्यायालयांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने ते खूप उपयुक्त आहे; पण तशी कुठली औपचारिक घोषणा दिली जायच्या खूप पूर्वीपासूनच पाडळी गाव तंटामुक्त होते. बहुसंख्य गावकऱ्यांचे उत्पन्नाचे एकमेव साधन त्याकाळी शेती हेच होते. म्हाळुंगी नदीवरच्या बंधाऱ्यांपासून छोटेछोटे पाट काढलेले होते. त्यांतले काही बाराही महिने वाहायचे. त्यामुळे बागायती क्षेत्र मोठे होते. शिवारातली जमीनही खूप सुपीक होती. सुवासिक असा कमोद जातीचा भात तिथे उत्तम निघे. बाजरी, मूग, चवळी निघे. मुख्य पिके निघाल्यावर शेतकरी भाजीपालाही काढत. आंब्याची डेरेदार झाडे सगळीकडे होती. त्यामुळे उन्हाळ्यात मुलांची अगदी चैन असायची. पुंड्या (गावठी) ऊस आणि भुईमूग तर प्रत्येकाच्या शेतात असायचा. त्या भागात साखर होत नव्हती पण चुलीवर मोठ्या कढईत उसाचा रस उकळून, घट्ट करून गूळ बनवायची प्रक्रिया सगळ्यांना ठाऊक होती. दादांच्या शेतावरचे असले गुऱ्हाळ हंगामात चांगले दीड-दोन महिने चालायचे. कोल्हापूरच्या गुळाप्रमाणेच पाडळीचा गूळही प्रसिद्ध होता. आमराईच्या सावलीत बसून उसाचा रस घट्ट होताना सुरुवातीला बनणाऱ्या काकवीबरोबर वा त्यानंतर निघणाऱ्या अर्धघट्ट गुळाच्या पिवळ्याधमक साईबरोबर कोवळ्या भुईमुगाच्या शेंगा खाणे गावच्या सगळ्याच आबालवृद्धांना आवडायचे. घरच्या दोन बैलांनाही पाटीलभाऊ रोज एकेक टोकर भरून उसाचा रस पाजत! त्यामुळे ते बैल चांगलेच तगडे झाले होते व शर्यतीत जोरात पळायचे. अशा बाबतीत पाटीलभाऊ मोठे हौशी होते. नदीकाठी केवड्याचे मोठे बन होते. त्याचा सुगंध साच्या आसमंतात दरवळत असे. जवळच पाताळगंगा नावाचा एक झरा होता. त्याचे स्फटिकासारखे शुभ्रधवल पाणी बाराही महिने गुंजारव करत वाहत असायचे. नदीलगतच्या खडकात एक मोठा धबधबा होता. व्याखाली बहुधा उल्कापातामुळे तयार झालेला खूप खोल व चिंचोळा असा डोह होता. डोहाच्या तीन बाजूंना उंच खडक. त्या खडकावरून खाली डोहात अचूक उड्या मारणे व नदीच्या पाण्यात तासन्तास डुंबणे हा मुलांचा अगदी आवडता छंद. यात धोका खूपच असायचा; कारण उडी जरा जरी चुकली, तरी खडकावर आपटून कपाळमोक्ष व्हायची भीती! लहानपणी एकदा चुकून खोल पाण्यात शिरल्यामुळे रावसाहेब बुडताबुडता वाचले होते; पण त्यामुळेच त्यांची जिद्द बळावली होती आणि ते लौकरच पट्टीचे पोहणारे बनले. विशेषत: उंच खडकावरून डोहात नेमकी उडी घेण्यात त्यांचा हातखंडा होता. परिसरशीलता हा माणसाचा एक स्वाभाविक गुण आहे. ज्या परिसरात आपण पाडळीतल्या पाऊलखुणा... २३