पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जेमतेम पाचशे लोकवस्ती असलेल्या पाडळी गावाला लक्षणीय असा इतिहास फारसा नाही. 'पाडळी' नावाची अनेक छोटी गावे महाराष्ट्रात आहेत. पु. ल. देशपांडे एकदा रावसाहेबांना म्हणाले होते, "अहो, तुमची पाडळी म्हणजे कोणत्यातरी शेजारच्या मोठ्या गावची 'पडळ' असली पाहिजे - घराला जशी पड़वी असते तशी.” शहराला उपनगर असावे तसाच हा प्रकार. 'पाडळी' नावाची ही व्युत्पत्ती खरीच असावी, कारण 'ठाणगाव-पाडळी' असेच या छोट्या गावाला खूपदा म्हटले जाते. ठाणगाव हे शेजारचे बाजारहाटाचे मोठे गाव; पाडळीचे सध्याचे पोस्ट ऑफिसही ठाणगाव इथेच आहे. गावची काही वयस्क माणसे पौराणिक काळाशी गावाचा संबंध जोडतात. उदाहरणार्थ, रामायणातील रावण व जटायू पक्षी यांच्यातील लढाई याच परिसरात झाली असे म्हटले जाते. महाभारतातील कच- देवयानी यांची कथाही इथून जवळच असलेल्या कोपरगाव परिसरात घडल्याचे ऐकिवात आहे. अर्थात अशा आख्यायिका भारतातल्या असंख्य गावांबद्दल प्रचलित आहेत व त्यांची सत्यासत्यता पडताळून पाहणे अशक्यच आहे. पाडळीच्या पश्चिमेला सुमारे पंधरा किलोमीटरवर पट्टा नावाचा किल्ला आहे. इथली म्हाळुंगी नदी याच किल्ल्यावर उगम पावते. सुरतेवरची स्वारी आटपून परतत असताना शिवाजीमहाराजांचा शत्रूने पाठलाग सुरू केला व त्यावेळी त्याला हुलकावणी देऊन महाराज या किल्ल्यावर काही दिवस विश्रांतीसाठी राहिले होते. म्हणून याला 'विश्रामगड' असेही म्हणतात. शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी एकदा तशी हकिकत रावसाहेबांना सांगितली होती. पाडळीला वर्षाकाठी सुमारे ४० इंच पाऊस पडत असे, आता ते प्रमाण बरेच कमी झाले आहे. गावाचे साधारण निम्मे शिवार ओलिताखाली आहे. इरिगेशनचा वापर इथे गेल्या अनेक पिढ्या होत आहे. म्हाळुंगी नदीवरचे साधारण तीनशे वर्षांपूर्वीचे तीन जुने बंधारे आजही टिकून आहेत. विशेष म्हणजे हे बंधारे सरकारने बांधलेले नसून रावसाहेबांच्या पूर्वजांनीच पुढाकार घेऊन व गावातील लोकांच्या सहकार्याने उभारलेले आहेत. इथले कालव्याच्या पाण्याचे वाटपही सरकारी यंत्रणेमार्फत कधी झालेले नाही. सरकार फक्त पाणीपट्टी वसूल करते; प्रत्यक्ष पाणीवाटप गावची समितीच अत्यंत चोखपणे करत असते. कदाचित त्यामुळेच इतरत्र होतात तसे या गावात पाणीवाटपावरून कधीच तंटे झाले नाहीत आणि जेव्हा कधी बारीकसारीक मतभेद झाले, तेव्हा सामोपचाराने आणि गावच्या पाटलांच्या पुढाकारातून मार्ग शोधला गेला. 'तंटामुक्त गाव' हे आज सरकारचे अजुनी चालतोची वाट... २२