पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्या भागाची बारकाईने पाहणी करून सविस्तर अहवाल पंडितजींना सादर केला. अण्णासाहेब ही एकूण कामगिरी उत्तम बजावतील याची तर यशवंतरावजींना खात्री होतीच, पण त्यांनी अण्णासाहेबांना नेहरूंच्या सान्निध्यात आणण्याची ही संधी मुद्दाम घेतली आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच झाले. पंडितजी नंतर त्यांना म्हणाले की, 'या माणसाला आपण दिल्लीला आणून मंत्रिमंडळात घेतले पाहिजे.' अण्णासाहेबांनी दिल्लीला जाण्याची ही जणू पूर्वतयारीच होती. १९६२ साली कोपरगाव मतदारसंघातून अण्णासाहेबांनी निवडणूक लढवली. योगायोग म्हणजे विरोधात होते त्यांचे परममित्र रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब रूपवते. प्रचारसभा संपली की खूपदा रूपवते अण्णासाहेबांच्या घरीच जेवायला जात ! १९७२ साली दक्षिण अहमदनगरमधून अण्णासाहेब निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची विजय मिरवणूक निघाली. ती रूपवतेंच्या घरावरून जात असतानाच अण्णासाहेबांनी मिरवणूक थांबवली, ते घरात गेले व आपल्या गळ्यातील हार त्यांनी प्रेमाने रूपवतेंच्या गळ्यात घातला. रूपवते म्हणाले, "अशी मैत्री, असा जिव्हाळा, असा बंधुभाव आणि लोकशाहीतील अशी खिलाडूवृत्ती विरळाच.” अण्णासाहेबांना अजातशत्रू म्हणत ते सार्थच होते. १९६२ सालच्या निवडणुकीनंतर अण्णासाहेबांची दिल्लीत पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून नेमणूक झाली. इकडे यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. पण लौकरच चीनचे आक्रमण झाले आणि यशवंतरावांची दिल्लीत संरक्षणमंत्री म्हणून नेमणूक झाली. तेव्हापासून यशवंतराव आणि अण्णासाहेब बरीच वर्षे दिल्लीत एकत्र राहिले. यशवंतरावांची साथ त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही व राजकीयदृष्ट्या अण्णासाहेबांनी त्याची पुरेपूर किंमत चुकवली. दिल्लीतील राजकारणात यशवंतरावांना प्रतिष्ठा होती यात शंकाच नाही; कारण एकतर त्यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा होता आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रासारख्या मोठ्या प्रांतातील काँग्रेस खासदार बव्हंशी एकमुखाने त्यांच्यामागे होते. पण त्याचबरोबर त्यांच्या निष्ठेविषयी मात्र इंदिरा गांधींना नेहमीच शंका असायची. खरेतर १९६६साली लालबहादूर शास्त्री यांच्या अकाली निधनानंतर यशवंतराव पंतप्रधानपदावर आपला हक्क सांगू शकले असते, अनेकांनी त्यांना तसे सुचवलेही होते. पण का कोण जाणे; आयत्यावेळी यशवंतराव ते धाडस करू शकले नाहीत. पुढे १९६९मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा आधी त्यांनी सिंडिकेट गटाची म्हणजेच निजलिंगप्पा, स. का. पाटील वगैरेंची बाजू घेतली होती; पण अजुनी चालतोची वाट... २२८