पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बऱ्याच ठिकाणी ब्राह्मणविरोधी वातावरण असूनही हे दोघेही जातिनिरपेक्ष विचार करणारे होते. या सगळ्या पार्श्वभूमीमुळे दोघांनी एकत्र येणे स्वाभाविकही होते. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला व यशवंतराव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. नवे नेतृत्व तयार करण्याला त्यांनी खूप प्राधान्य दिले. त्यांच्याच प्रयत्नांतून अण्णासाहेब साखर कारखाना संघाचे अध्यक्ष बनले, इरिगेशन समितीचे सदस्य बनले. लौकरच १९६२ साली काँग्रेसच्या तिकिटावर कोपरगाव मतदारसंघातून अण्णासाहेब थेट लोकसभेवर निवडून गेले; त्यापूर्वी ते कधी आमदारही नव्हते किंवा अगदी नगरपरिषदेचे सदस्यही नव्हते. अण्णासाहेब एकदम ही उडी घेऊ शकले याचे एक मुख्य कारण म्हणजे सुमारे दोन वर्षांपूर्वी पंडित नेहरूंबरोबर आलेला त्यांचा संबंध. त्यासंदर्भात कृषिक्रांतीचे सेनानी या अण्णासाहेबांच्या चरित्रात चरित्रकार सविता भावे लिहितात: " जून १९६० मध्ये पुणे येथे महाराष्ट्रातील सहकारी कार्यकर्त्यांचा एक प्रचंड मेळावा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरला होता. त्यावेळी यशवंतरावजींनी प्रवरेचे चीफ प्रमोटर म्हणून विठ्ठलराव विखे पाटील यांना व्यासपीठावर बोलावून त्यांची पंडितजींशी ओळख करून दिली होती. १९६१च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विखे-पाटील यांना 'पद्मश्री' ही पदवी राष्ट्रपतींकडून बहाल करण्यात आली. या सर्व प्रसंगी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष म्हणून आणि यशवंतरावजींचे प्रमुख सहकारी म्हणून अण्णासाहेब उपस्थित होते. यशवंतरावजींनी ही संधी घेऊन वेळोवेळी पंडितजींना प्रवरानगरला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते आणि त्याप्रमाणे १५ मे १९६१ रोजी त्यांनी प्रवरेला येण्याचे मान्य केले. कारखान्याच्या सभासदांनी शेती सुधारण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत याची पंडितजींना कल्पना यावी म्हणून टेकावडे यांची उसाची शेती त्यांना दाखविण्यात आली. तेथील बारा फूट उंचीचा ऊस पाहून पंडितजी चकित झाले व उद्गारले, 'इतना उँचा गन्ना हम ने आजतक जिंदगी में देखा नहीं!" उत्तर प्रदेशातल्या आपल्या फूलपूर मतदारसंघातही असेच काम व्हावे अशी पंडितजींची इच्छा होती. त्यादृष्टीने एखादा माणूस द्या अशी त्यांनी यशवंतरावांना विनंती केली. यशवंतरावांनी लगेचच अण्णासाहेबांचे नाव सुचवले. त्यानुसार पंडितजींनी अण्णासाहेबांना दिल्लीला बोलावून घेतले. तेथे इंदिराजींचा त्यांच्याशी परिचय करून देऊन त्यांनी म्हटले की, 'या खास मेहमानाची व्यवस्था तू पाहायची.' त्याचप्रमाणे श्री. उमाशंकर दीक्षित आणि श्री. यशपाल कपूर या दोघांना त्यांनी अण्णासाहेबांबरोबर आपल्या मतदारसंघाचा, फूलपूरचा, दौरा करून त्यांच्या सूचना नीट समजावून घ्याव्या असे सांगितले. त्याप्रमाणे अण्णासाहेबांनी त्वमेव बंधुः सखा त्वमेव... २२७