पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होते; मालमत्तेच्या वाटणीवरून होणारी भावाभावांमधील भांडणे तेव्हाही होतीच; अगदी मारामारी - कोर्टबाजीपर्यंतही मजल जायची. त्या पार्श्वभूमीवर या दोन भावांचे औदार्य आणि सामंजस्य खूपच उठून दिसते. आजही स्थानिक मंडळी आदर्श बंधुभावाचे उदाहरण म्हणून या घटनेचा उल्लेख करतात. या सगळ्यामध्ये अण्णासाहेबांचाच पुढाकार होता. रावसाहेब व अण्णासाहेब यांच्यातील विलक्षण प्रेमाविषयी रावसाहेबांच्या कन्या सुजाताई लिहितात, "पप्पांच्या पहिल्या हार्ट अॅटॅकनंतर पप्पा हॉस्पिटलमधून थेट काकांच्याच घरी राहायला गेले. त्यावेळी आपल्या सगळ्या कामांमधून काका पप्पांसाठी खास वेळ काढत असत. त्यानंतरही एकदा पप्पांच्या आजारपणात जवळजवळ महिनाभर काका श्रीरामपुरातच राहिले. रोज सकाळी दहा वाजता ते घरी येत. इतर गप्पागोष्टी व्हायच्याच पण त्याशिवाय एखादे इंग्रजी नियतकालिकही त्यांनी सोबत आणलेले असे व त्यातील एक-दोन लेख ते पप्पांना वाचून दाखवत; त्यावर चर्चा करत. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट या दोन भावांनी एकमेकांच्या सल्ल्यानेच केली. एकोप्याची तीच भावना आम्हां मुलांमध्येही आली. आज काका नाहीत, पण आमच्या संयुक्त विस्तारित कुटुंबातील मुलेदेखील आपल्या कुठल्याही अडचणीच्या वेळी पप्पांचा आवर्जून सल्ला घेतात. अगदी अशाच प्रकारचे नाते पप्पा व डॅडी (मेहुणे दिनकरराव वाघ) यांच्यात आहे. मुलांची शिक्षणे, लग्ने, हौसमौज, प्रवास या सगळ्यात आमची दोन्ही कुटुंबे एकत्र असतात. मी नववीत होते तेव्हापासून मी घरापासून दूर राहिले आहे आणि आता तर मी परदेशात राहते. आमची सर्वच भावंडे वेगवेगळ्या देशांमध्ये विखुरलेली आहेत. पण माझी शंभर टक्के खात्री आहे, की कोणावरही कधी संकट आले तर आम्ही लगेच मदतीसाठी धावून जाऊ आणि हा वारसा आम्हांला पप्पा-मम्मींनी दिला आहे." कम्युनिस्ट पक्षापासून भ्रमनिरास झाल्यावर अण्णासाहेब समाजकारणात सक्रिय राहिले तरी सुरुवातीची दहा-बारा वर्षे ते राजकारणापासून मात्र अलिप्त होते. १९५६ ते १९६२ अशी सहा वर्षे श्रीरामपूरहून त्यांनी जनसत्ता नावाचे एक साप्ताहिक चालवले. त्यात ते राजकीय प्रश्नांचीही चर्चा करत; पण तो सहभाग केवळ वैचारिक पातळीवरचा असे. पुढे मुख्यत: यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. त्यांच्याप्रमाणेच यशवंतरावही ग्रामीण, शेतकरी कुटुंबातले होते; परिस्थितीशी झगडून दोघांनीही वकिलीचे शिक्षण घेतले होते आणि दोघांनाही वाचनाची खूप आवड होती. मार्क्सवादाचा प्रभाव दोघांवरही होता आणि पंडित नेहरूंविषयी दोघांनाही प्रचंड आदर होता. दोघेही मराठा समाजातले होते आणि त्यावेळी पश्चिम दक्षिण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजुनी चालतोची वाट... २२६