पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नकोस.' हे मला पत्नीकडून फारच उशिरा समजले. त्यांचा तो जिव्हाळा मनाला चटका लावतो. माझ्या विवाहानंतर काही महिन्यांतच त्यांनी आम्हां उभयतांना स्वतंत्र राहण्याची सर्व व्यवस्था करून दिली. त्यांचे त्या वेळचे भाड्याचे घर लहानसे व अडचणीचे होते. आमचे आई-वडील, अण्णाभाऊंची मुले व ते उभयता असे मोठे कुटुंब. तेथेच ऑफिस. त्यात आम्ही नवविवाहित. त्यामुळे अतिशय जाणीवपूर्वक त्यांनी आमचा स्वतंत्र असा नवा संसार थाटून दिला. " (चरित्र आणि चारित्र्य, पृष्ठ ८९) आपला धाकटा भाऊ म्हणून त्यांनी रावसाहेबांकडे पाहिले नाही; एक प्रकारे पित्याचीच भूमिका त्यांनी बजावली. आपली धाकटी बहीण सिंधूताई हिचेही सगळे शिक्षण त्यांनीच केले; तिचे दिनकर वाघांबरोबर लग्नही त्यांनीच मोठ्या थाटात लावून दिले. अशीच पाठराखण अण्णासाहेबांनी आपल्या मोठ्या भावाची, म्हणजे पाटीलबुवांची केली. ते पाडळीलाच राहत; घरची वडिलोपार्जित शेती सांभाळत. इतर भावांप्रमाणे ते पाडळी सोडून कुठे गेले नाहीत किंवा त्यांनी कधी अन्य कुठला व्यवसायही केला नाही. त्यांचा परिवारही मोठा होता. त्यामुळे त्यांच्या घरी कायम आर्थिक चणचण असे. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न अण्णासाहेबांनीच जुळवले; सगळा खर्चही त्यांनीच केला. श्रीरामपुरातच त्यांनी लग्नसमारंभ केला. पाटीलबुवांच्या धाकट्या कन्येच्या लग्नातही त्यांनी शक्य तेवढी मदत केली. आपल्या आईवडलांचा सांभाळही त्यांनी प्रेमाने केला. १९५० साली श्रीरामपुरात आल्याआल्या त्यांनी आईवडलांना स्वतःच्याच घरी बोलावून घेतले. सलग बारा वर्षे त्यांना सांभाळले. १९६२मध्ये ते दिल्लीला गेल्यानंतरच आई-वडील रावसाहेबांकडे राहू लागले. काळाच्या ओघात शेतीच्या वाटणीचा प्रश्न उद्भवला. पाडळीतील त्यांची शेती खूप नसली तरी किमती होती; म्हाळुगी नदीचे पाणी मुबलक होते. तांदूळ, ऊस, भुईमूग यांचे उत्तम पीक निघायचे. पण पाटीलबुवांची बिकट आर्थिक स्थिती विचारात घेऊन दोन्ही भावांनी आपापला वाटा कुठलाही मोबदला न घेता किंवा आढेवेढे न घेता खूप पूर्वीच मोठ्या भावाच्या नावे करून दिला. हे त्या काळाइतकेच आजही आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद वाटते. एकतर दोन्ही धाकट्या भावांची आर्थिक स्थिती सामान्यच होती. आयुष्यातील काही वर्षे त्यांनी चळवळीतच घालवली होती. दुसरे म्हणजे आपली हक्काची जमीन दुसऱ्या एखाद्या भावाला फुकटात देऊन टाकणे हे आजच्याइतकेच त्यावेळीही दुर्मिळ त्वमेव बंधुः सखा त्वमेव... २२५