पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोक बघत होते. 'वकील पुरता मातीत जाणार' असेच ते उपहासाने म्हणायचे. कारण या वैराण जमिनीतून कधी चांगले पीक निघेल यावर कोणाचाच विश्वास नव्हता. पण अण्णासाहेबांची मेहनत कामी आली. ऊस, गहू, कपाशी यांची भरघोस पिके निघू लागली. पुढे अण्णासाहेबांनी शेतीत अनेक प्रयोग केले, नवनवीन बियाणे वापरली, वेगवेगळी खते - औषधे वापरली. त्यांच्या शेतीविषयक मतांना प्रत्यक्ष कार्याची जोड मिळाली. आपल्या शेतीउद्योगाला त्यांनी गाईगुरांचीही जोड दिली. एकवेळ अशी होती, की त्यांच्याकडे शंभर- एक संकरित गाई होत्या. ' आधी केले, मग सांगितले,' अशी त्यांची भूमिका होती व त्यामुळे त्यांच्या बोलण्याला एक वेगळेच वजन प्राप्त होई. इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच रावसाहेबांचे शेतीमधले पदार्पणही अण्णासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकूनच झाले. लॉ कॉलेजात शिकत असतानापासूनच रावसाहेब कोल्हारच्या शेतावर येत असत; पडेल ते काम जमेल तेवढे करत असत. पुढे त्या भागात अशोक सहकारी कारखाना सुरू झाला तेव्हा त्यांना अण्णासाहेबांनीच काही शेअर घेऊन दिले व ते शेअर घेता यावेत यासाठीची पूर्वअट पाळता यावी म्हणून अण्णासाहेबांनीच त्यांना भोकर येथे खंडाची जमीन घेऊन दिली. त्यातूनच रावसाहेबांचा स्वतःचाही स्वतंत्र शेतीव्यवसाय सुरू झाला. पुढे काही कारणांनी त्यात अडचणी येऊ लागल्या. कोणीतरी दिलेले शेतातले इंजिन नीट चालेना. त्यामुळे उसाचे पीक आले नाही. कर्ज झाले. रावसाहेब शेतीबाबत निराश झाले. हे लक्षात आल्यावर लगेच अण्णासाहेबांनी स्वत:च्या शेतातले ऑइल इंजिन त्यांच्या शेतावर पाठवून दिले. रावसाहेबांची शेती पुन्हा सुरू झाली, पीकही चांगले आले. यथावकाश मग रावसाहेबांनीही उत्तम शेती केली. रावसाहेबांच्या विवाहातही अण्णासाहेबांनी स्वतः होऊन बराच खर्च केला; पण त्याचा कधी उल्लेखही कुठे केला नाही. लग्नानंतरही काही महिने रावसाहेब सपत्निक अण्णासाहेबांच्याच घरी त्यांच्याबरोबर राहत होते; त्यांची वकिली स्वतंत्र असली तरीही. रावसाहेबांना त्यांनी सतत वडिलकीचा आधार दिला. रावसाहेब एके ठिकाणी लिहितात : "माझा स्वभाव मुळातच खूप तापट. अशा वेळी मला आवरणे कठीण म्हणण्यापेक्षा अशक्यच असते. माझा नुकताच विवाह झाला होता. पत्नी सौ. शशिकलेचा स्वभाव अतिशय सौम्य आणि सोशिक. अण्णाभाऊ तिला म्हणाले, 'शशी, रावसाहेब स्वभावाने फारच तापट आहे. कदाचित त्यामुळे तुला अडचणीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. तसे काही झाले तर मला सांग. घाबरून जाऊ अजुनी चालतोची वाट... २२४