पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रवरानगर साखर कारखान्याच्या निर्मितीकाळात कारखान्याचे मुख्य शिल्पकार विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासह इतर काहींप्रमाणेच अण्णासाहेबांचाही मोलाचा सहभाग होता. माळीनगरला माळी समाजाच्या शेतकऱ्यांनी एक साखर कारखाना कंपनी म्हणून यशस्वीरीत्या चालवला होता; तशा प्रकारचा तो पहिलाच प्रयोग होता. महाराष्ट्रातील ऊसशेती खरी सुरू केली ती याच शेतीतील बाकबगार अशा समाजाने. तसे पाहिले तर तो सहकाराचा आत्मा असलेला देशातील पहिला साखर कारखाना. त्याचे मालक-सदस्य फक्त माळी समाजातलेच असावेत म्हणून तो खासगी कंपनी कायद्याखाली रजिस्टर करण्यात आला होता. महाराष्ट्र प्रांत सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ यांना त्याची माहिती होती. शेतकऱ्यांच्या दारिद्र्यावर व कर्जबाजारीपणावर सहकारी शेती व सहकारी कारखानदारी हेच योग्य उत्तर आहे याचीही डॉ. गाडगीळांना कल्पना होती. खरे तर जगातल्या अनेक देशांमध्ये त्यावेळी सहकाराचे तत्त्व बऱ्यापैकी प्रस्थापित झाले होते. ज्येष्ठ काँग्रेसनेते वैकुंठभाई मेहता यांचीही हीच धारणा होती. पी. बी. कडू पाटील आणि अण्णासाहेब यांचाही प्रवरा कारखाना उभारणीत सहभाग होता. चंद्रभान पाटील घोगरे, आबासाहेब धुमाळ, लामखडे मास्तर हीही मंडळी विठ्ठलराव विखे पाटलांबरोबर होती. प्रवरा साखर कारखान्यामागे या सर्वांचे एकत्रित प्रयत्न होते, असे रावसाहेब म्हणतात. अण्णासाहेब वकिली सुरू करण्यासाठी प्रथम संगमनेरहून श्रीरामपूरला आले त्यावेळी त्यांच्या खिशात फक्त पाच रुपये होते. त्यातून त्यांनी एक कंदील विकत घेतला. श्रीरामपुरात त्यावेळी वीज नव्हती व दिवस मावळल्यावर काहीही काम करायचे असले कंदील अत्यावश्यक होता. पण जसजसे आर्थिक स्थैर्य येऊ लागले तसतसे शेतीचे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. श्रीरामपूरहून जवळच कोल्हार येथे त्यांनी तीसएक एकर जमीन खंडावर घेतली. ही जमीन वर्षानुवर्षे पडीक होती, उंचसखल होती. तिथली झाडेझुडपे तोडून जमीन सपाट करणे, ती लागवडीयोग्य करणे हे सारे कष्टाचे आणि तेवढेच खर्चाचे काम होते. पण अण्णासाहेब मोठ्या जिद्दीने शेतीत पडले; तशी शेती त्यांच्या रक्तातच होती. दहा हॉर्स पॉवर इंजिन लावून त्यांनी विहिरीचे पाणी उपसायला सुरुवात केली. मिळेल तेथून शेणखत, कचराखत आणले. स्वत:ही अतोनात कष्ट घेतले. शनिवार- रविवार ते शेतावरच थांबत. रात्री शेतातच उघड्यावर झोपत. अंथरायला एखादी सतरंजी, पांघरायला एखादी चादर. शेतीवर ते किती खर्च करताहेत हे आजूबाजूचे त्वमेव बंधुः सखा त्वमेव... २२३