पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होती, पंधरा-वीस पट अधिक उत्पन्न देणारी होती याची कल्पना येते. त्याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी आपली सगळीच जमीन खंडाने दिली होती व त्यामुळे ज्यांच्या कडे स्वत:साठी काहीच जमीन उरली नव्हती त्यांना प्रत्येकी साडेचार एकर जमीन स्वतः कसण्यासाठी परत द्यायची असाही निर्णय झाला. ज्यांनी आपल्या जमिनी खंडाने दिल्या होत्या त्या मूळ मालकांना आणि ज्यांनी त्या कसण्यासाठी खंडावर घेतल्या होत्या त्या दोघांनाही लवादाचा हा निर्णय समाधानकारक वाटला आणि दीर्घकाळ चिघळत राहिलेला एक प्रश्न बऱ्यापैकी सुटला. कुठलीही चळवळ सुरू करताना थांबायचे कधी याचेही नेमके भान नेत्यांना असणे अत्यावश्यक असते. कुठल्याही चळवळीचा जोर कालांतराने आटतोच. बेचाळीसच्या स्वातंत्र्यआंदोलनात आणि अठ्ठेचाळीसच्या कम्युनिस्ट आंदोलनात काही काळानंतर चळवळ कशी थंडावते यांचा अनुभव अण्णासाहेबांना होताच. नेत्यांनी आपल्या अहंकाराच्या तृप्तीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी लढे सतत लांबवायचे आणि त्यात सर्वसामान्य माणसांनी मात्र भरडून निघायचे हे चित्र खूप ठिकाणी दिसते. ते टाळण्याची परिपक्वता अण्णासाहेबांनी दाखवली आणि कायदेशीर मार्गाने, लवादामार्फत जास्तीत जास्त समाधानकारक तोडगा काढला. अर्थात याचा अर्थ खंडकऱ्यांचा प्रश्न कायमसाठी सुटला असा काही ; तसा कुठलाच प्रश्र कधी १०० टक्के मिटत नाही. अजूनही अनेक जमिनी तंटाबखेड्यात अडकलेल्या आहेत; शिवाय साखर कारखान्यांकडून ज्या खंडावरच्या जमिनी काढून घेतल्या त्या स्टेट फार्मिंग कॉर्पोरेशनच्या ताब्यात देण्यात आल्या; खूपदा मूळ जमीनमालकांपर्यंत त्या अजून पोचलेल्याच नाहीत. त्याशिवाय या लढ्याची व्याप्तीही आता खूप वाढलेली आहे. बेलापूर शुगर आणि महाराष्ट्र शुगर या दोन कंपन्यांकडील खंडावरच्या जमिनीपुरता हा प्रश्न आता सीमित राहिलेला नाही; महाराष्ट्रातील सर्वच खासगी कारख डील जमिनीच्या बाबतीत आता हा प्रश्न उभा राहिला आहे. याची जाणीव असल्यामुळेच मनमाडचे कम्युनिस्ट पुढारी कॉ. माधवराव गायकवाड यांना अण्णासाहेबांनी श्रीरामपुरात बोलावून घेतले व त्यांच्या हाती हा लढा सोपवला. पुढे कॉ. पी. बी. कडू पाटील यांनी या खंडकऱ्यांना नेतृत्व दिले. यापुढे संघर्षाचे राजकारण न करता उभारणीच्या समाजकारणावर लक्ष केंद्रित करायचे अण्णासाहेबांनी स्वतः पुरते ठरवले होते. त्यांनी हे नेतृत्व इतरांकडे सोपवले हा त्याचाही एक परिणाम असू शकेल. तरीही शेतकऱ्यांच्या या एका महत्त्वाच्या प्रश्नावर पहिली चळवळ उभारायचे व तिच्या जोडीने कायदेशीर मार्गानेही त्याचवेळी तो प्रश्न धसास लावण्याचे पहिले श्रेय नक्कीच अण्णासाहेबांना द्यावे लागेल. अजुनी चालतोची वाट... २२२