पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वास्तविकरीत्या 'कॉमिन्फॉर्म'ने तीन वर्षांनंतर निदर्शनास आणलेली भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणातील घोडचूक अण्णाभाऊंनी सुरुवातीलाच पक्षाच्या लक्षात आणून दिली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने खरेतर अण्णाभाऊंच्या द्रष्टेपणाबद्दल त्यांचा गौरव करायला पाहिजे होता. तथापि कम्युनिस्ट पक्षाने अण्णाभाऊंना वाळीतच टाकले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा माणूस जागा होतो हे गोदावरी परुळेकर यांचे आत्मकथन. एरवी ते एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे, पण परुळेकर पतिपत्नी अज्ञातवासात असताना ज्या शिंदेबंधूंनी व भाऊसाहेब थोरातांनी त्यांना कित्येक महिने सुरक्षित आसरा पुरवला व त्यांचा अहमदनगर जिल्ह्याचा दौरा घडवून आणला त्यांचा नामोल्लेखही या पुस्तकात नाही. उद्वेगाच्या भरात अण्णासाहेबांनी संगमनेर सोडले आणि वकिलीच्या व्यवसायासाठी ते श्रीरामपूरला गेले. श्रीरामपूरला त्यांना सगळे नवीन होते. शिवाय अद्यापही सरकारी बंधनानुसार त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी द्यावी लागत असे. मोरारजी सरकारचा तसा त्यांच्याविरुद्धचा आदेश होता. पण प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून अण्णाभाऊंनी व्यवसायात जम बसवला. लवकरच ते लोकप्रिय वकील झाले. पण अण्णासाहेबांचा मूळ पिंड हा सामाजिक परिवर्तनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याचाच होता. केवळ एक व्यवसाय म्हणून वकिली करण्यात त्यांना स्वारस्य नव्हते. त्यामुळेच 'धंदा' वाढवण्यापेक्षा अन्यायग्रस्त खंडकऱ्यांच्या लढ्यासाठीच त्यांचा बहुतेक वेळ जात असे; त्यांच्या दृष्टीने वकिली हे पैसे मिळवण्याचे नव्हे तर समाजसेवेचेच एक हत्यार होते. त्यावेळी मुंबई प्रांतात बाळासाहेब खेर व मोरारजी देसाई यांचे सरकार होते व त्यांचा अण्णासाहेबांनी उभारलेल्या खंड कऱ्यांच्या या लढ्याला विरोधच होता. मागील प्रकरणात अण्णाभाऊंनी उभारलेल्या खंडकऱ्यांच्या लढाईची पार्श्वभूमी आलेलीच आहे. नाशिकचे भाऊसाहेब हिरे त्यावेळी महसूलमंत्री होते व त्यांची सहानुभूती मात्र खंडकऱ्यांकडे होती. नाशिकचे आपले स्नेही काकासाहेब वाघ यांना मध्यस्थ घालून अण्णासाहेबांनी भाऊसाहेब हिरे यांना सगळी बाजू नीट समजावून सांगितली; एका लवादाची नेमणूक करून घेतली. लवादाने खंडकऱ्यांच्या हिताचा निवाडा दिला. पाटपाण्याच्या जमिनीला एकरी पन्नास रुपये, आठमाही जमिनीला एकरी पंचवीस रुपये आणि जिरायत जमिनीला एकरी साडेबारा रुपये अशी खंडाची रक्कम वाढवण्यात आली. पाटपाण्याच्या जमिनीला पूर्वी फक्त एकरी दोन-पाच रुपयेच मिळत होते; त्यावरून खंडातील ही वाढ किती भरीव त्वमेव बंधुः सखा त्वमेव... २२१