पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानात चीनप्रमाणे कम्युनिस्ट प्रभाव कानाकोपऱ्यात पसरला असता. नगर जिल्ह्यातील कम्युनिस्ट चळवळ भारतीय साम्यवादी चळवळीतील अग्रक्रमाची तुकडी बनली असती; ज्यामुळे हिंदुस्थानचा इतिहास बदलविण्याचे ऐतिहासिक कार्य नगर जिल्ह्याने केले असते. पण नियतीची इच्छा काही निराळीच होती. तुरुंगात असताना वाचन-चिंतन - चर्चा या सगळ्यासाठी अण्णासाहेबांना भरपूर वेळ मिळाला व त्याचा परिपाक म्हणजे ते कम्युनिझमपासून दूर गेले. पुढे रावसाहेबांचा प्रवासही याच दिशेने झाला. त्याबद्दल विस्ताराने पूर्वी आलेलेच आहे. फरक इतकाच की कम्युनिझमपासून भ्रमनिरास झाल्यावर रावसाहेब राजकारणापासूनच अगदी दूर गेले तर अण्णासाहेब मात्र काँग्रेसकडे वळले. इतर कुठल्याही मार्गापेक्षा पंडित नेहरूंच्या काँग्रेसमध्येच राहून समाजाचे अधिकाधिक हित साधता येईल याविषयी त्यांची खात्री पटली. तसा पूर्वीपासूनच त्यांच्यावर नेहरूंचा प्रभाव होता. अगदी १९३७ सालच्या संगमनेरच्या त्या जाहीर सभेपासून. अण्णासाहेब जेलमधून सुटून आल्यावर प्रथम संगमनेरलाच गेले होते. पूर्ववत तेथेच वकिली व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस होता. पण ते बहिष्कृत असल्यासारखी वागणूक तिथल्या कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांना मिळायला लागली. ज्या संघटनांचे स्वरूप एखाद्या ठाशीव विचारधारेचे (आयडिऑलॉजीचे) असते, म्हणजेच ज्या संघटनांचे स्वरूप तुमच्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना नियंत्रित करणारे असते, त्या संघटनांमध्ये 'परधर्मसहिष्णुता' नसते, बहुकेंद्रितता (प्लुरॅलिटी) नसते. 'फक्त आमचीच वाट हे सगळ्या प्रश्नांवरचे उत्तर आहे आणि दुसऱ्या सगळ्या वाटा चुकीच्याच आहेत' असा त्यांचा आग्रह असतो. त्या आग्रहामुळेच, संपूर्ण निष्ठेच्या मागणीमुळेच, त्यांच्यातला परस्परस्नेह टोकाचा असतो, एकजूट अभेद्य असते; पण ज्याक्षणी तो एकमेवाद्वितीयतेचा आग्रह नाहीसा होतो त्याक्षणी तो स्नेह, ते एकत्व संपते. साम्यवाद्यांप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनाही वेगळ्या वाटेवर जायचे ठरवल्यावर या विषण्ण करणाऱ्या अनुभवाला तोंड द्यावे लागले आहे. "Any idea is dangerous when it is the only idea you posses" असे म्हणतात ते यामुळेच. याचा पुरता अनुभव त्या काळात अण्णाभाऊंना आला. अतिशय जिवाभावाने एकमेकांवर प्रेम केलेले कार्यकर्तेही त्यांच्याशी दुराव्याने वागू लागले. अण्णाभाऊंच्या मनाला याचा खूपच मानसिक ताप व्हायला लागला. गेल्या कित्येक वर्षांत त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता तो फक्त कम्युनिस्ट मित्रांशीच; आणि आता त्यांच्याकडूनच अशी वागणूक मिळणे हा एक प्रकारचा छळवाद होता. अजुनी चालतोची वाट... २२०