पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाईला त्यांचा राग का येत नाही, तिचे त्यांच्यावरचे प्रेम तेवढेच कसे काय, असा प्रश्न मोठेपणी एकदा रावसाहेबांनी बाईंना विचारला होता. त्यावेळी बाईंनी उत्तर दिले होते, "भाऊ, पाचही बोटं आपलीच असतात ना रे? ती सगळी सारखीच असतात का? मधलं बोट कसं लांबसडक, करंगळी कशी बारीकशी, अंगठा कसा जाडसर आणि आखूड. तरीही आपण सगळ्यांना सारखाच जीव लावतो ना ? " ही आठवण सांगताना पुढे रावसाहेब म्हणतात, "मी गुणदोष सांगत होतो आणि दोष असणाऱ्या पाटीलभाऊंवर तुमचा राग कसा नाही, असा प्रश्न विचारत होतो. बाईने दिलेलं उत्तर आणि पुढे केलेलं आपल्याच हाताच्या बोटांचं उदाहरण हे खरोखरच एखाद्या पंडिताला तोंडात बोट घालायला लावणारं होतं. बाईने खरोखरच मला निरुत्तर केलं होतं. " केवळ बौद्धिक पातळीवर विचार केला, तर जो आपल्याशी अधिक चांगला वागतो त्याच्याशी आपण अधिक चांगले वागावे ही भूमिका न्याय्य वाटते. पण आपण स्वतःला कितीही बुद्धिवादी मानले, तरी आपल्या वागण्यावर बुद्धीपेक्षा हृदयाचीच सत्ता अधिक चालत असावी. बहुधा त्यामुळेच सर्व मुलांना समान वाटप करण्यापेक्षा 'जिथे कमी तिथे आम्ही' ही आईवडिलांची भूमिका असते; जिथे गरज जास्त, तिथे अधिक दिले जाते; व त्या असमान वाटपातही कधीकधी अधिक न्याय असतो. समानतेने वागणे हे प्रत्येक वेळी न्याय्य नसते कारण खूपदा न्यायाचा संबंध हा समानतेपेक्षा प्रेमाशी अधिक असतो. म्हणूनच आपल्याशी अधिक चांगले वागणाऱ्या मुलावर आई-वडील अधिक प्रेम करतील आणि आपल्याशी नीट न वागणाऱ्या मुलावर कमी प्रेम करतील असे सहसा घडत नाही. उलट तसे वागणाच्या मुलाच्या वाट्याला खूपदा आईवडिलांची अधिक माया येते. कुठलेही औपचारिक शिक्षण मानवी वर्तणुकीतील ही गुंतागुंत समजावून देत नाही आणि अशा अनेक महत्त्वाच्या बाबी आपल्या ल्पशिक्षित आई-वडिलांकडून रावसाहेबांना शिकता आल्या. आपल्या आईविषयी लिहिलेल्या एका भावपूर्ण लेखाचा शेवट करताना रावसाहेब ग. दि. माडगूळकरांच्या पुढील चार ओळी उद्धृत करतात दिला जन्म तू विश्व हे दाविलेस। किती कष्ट माये सुखे साहिलेस। जिण्यालागी आकार माझ्या दिलास | तुझ्या वंदितो माउली पाऊलास/ या ओळींमध्ये रावसाहेबांच्याही भावना पुरेपूर उतरल्या आहेत. - पाडळीतल्या पाऊलखुणा...