पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वितरणासाठी व ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागते, त्यात अनेक किचकट बारकावे असतात, अनेक कायदेकानून पाळावे लागत. या सगळ्यांचा त्यांना काहीच अनुभव नव्हता. विड्यांचे उत्पादन तर झाले पण त्या खपवणे काही त्यांना जमले नाही व शेवटी तो विडीकारखाना बंदच करावा लागला. 'जेणू काम तेणू थाय, बिजा करे ते गोतो खाय' या त्यांना चांगल्या परिचित असलेल्या गुजराती भाषेतल्या म्हणीचा प्रत्यय आला. अयशस्वी ठरला असला तरीही हा विडीकारखान्याचा प्रयोग अण्णासाहेबांची जडणघडण समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कम्युनिस्ट पक्षाचा त्यांच्यावरील प्रभाव ऐन भरात असतानासुद्धा ते पोथिनिष्ठ कम्युनिस्ट नव्हते हे यावरून दिसते. सहकारी तत्त्वाचे महत्त्व त्यांना जाणवले होते हे यावरून दिसते. केवळ संघर्षाचे राजकारण पुरेसे नाही, त्याला उभारणीच्या विधायक कामाची जोड देणे आवश्यक आहे याची जाण त्यांना होती हेही यावरून दिसते. कार्यकर्त्यांमधले घनिष्ठ व्यक्तिगत संबंध हे तत्कालीन कम्युनिस्ट पक्षाचे एक वैशिष्ट्य होते. भाऊसाहेब कानवडे यांच्याकडे उमेदवारी करत असतानाच अण्णासाहेबांनी एक मित्रकर्तव्य पार पाडले - चंद्रभान आठरे-पाटलांबरोबर कानवडेंची मुलगी मीरा हिचा विवाह लावून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. मीराबाई शहरात वाढलेल्या, तर आठरे कुटुंबीय खेड्यातले; ही मुलगी आपल्या कुटुंबात कशी समरस होईल याविषयी आठरे मंडळी साशंक होती; लग्नाला तयार नव्हती. पण अण्णासाहेबांची मध्यस्थी यशस्वी झाली. १९४७च्या सुरुवातीला नगरच्या मराठा बोर्डिंगमध्ये दोघांचे लग्न झाले. · त्यानंतर थोड्याच दिवसांनी अण्णासाहेब आणि हिराबाई थोरात यांचेही लग्न झाले. संगमनेरपासून पाच मैलांवर जोर्वे गावी थोरातांची वस्ती होती. दुसऱ्या बाजूला पाच मैलांवर कोल्हेवाडी होती. ल्हेवाडीला कृष्णाआत्या दिघेंकडे राहूनच अण्णासाहेबांचे शिक्षण झाले होते. कृष्णाआत्येच्या भावाचा मुलगा म्हणजे अण्णासाहेब आणि नणंदेची मुलगी म्हणजे हिराबाई. कृष्णाआत्येच्या पुढाकारातूनच अण्णासाहेब व हिराबाई यांचे जोर्व्याच्या दत्तमंदिरात ११ जून १९४७ रोजी लग्न झाले. पूर्वी लग्ने दोन-तीन दिवस चालायची, पण हे लग्न एका दिवसातच आटोपले. लग्न खूप साधेपणाने झाले, पण संपूर्ण जिल्ह्यातले कार्यकर्ते लग्नाला हजर होते. संगमनेरला वकिलीचा व्यवसाय सुरू करून एका भाड्याच्या घरात दोघांनी संसाराला सुरुवात केली. दुर्दैवाने थोड्याच दिवसांनी त्यांच्या नशिबी एक विरहयोग येणार होता. २ एप्रिल १९४८ची ती एक घटना. संगमनेरच्या मामलेदार कचेरीवर अजुनी चालतोची वाट... २१८