पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुण्याच्या लॉ कॉलेजात प्रवेश घेतला. खरे तर तोवर कॉलेज सुरूही झाले होते पण प्राचार्य पंडित हे अतिशय मदतशील होते व त्यामुळेच अण्णासाहेबांना कॉलेजात व वसतिगृहातही प्रवेश मिळाला. त्यावेळी पुण्यातल्या कम्युनिस्ट पक्षाच्या कम्यूनमध्येही ते नेहमी जात. आर्थिक अडचण त्यावेळी कायमच होती व परीक्षेची फी भरायलाही पैसे नव्हते. तुरुंगात असताना मित्र बनलेल्या दत्ता देशमुख यांना त्याची कल्पना होती. नगर जिल्ह्यातल्याच एका सधन कुटुंबातील शंकरराव काळे त्यावेळी पुण्यात शिकत होते. दत्ता देशमुखांच्या विनंतीवरून त्यांनी अण्णासाहेबांची परीक्षा फी भरली व एकदाचे अण्णासाहेबांचे एलएल. बी. पूर्ण झाले. त्यानंतर बार कौन्सिलची परीक्षा देण्यात चार-पाच महिने गेले. त्यानंतर प्रत्यक्ष अनुभव यावा म्हणून त्यांनी अहमदनगरचे एक प्रस्थापित वकील भाऊसाहेब कानवडे पाटील यांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. सोबतच कम्युनिस्ट पक्षाच्या कामामध्येही ते अधिकाधिक भाग घेऊ लागले. जिल्ह्यातील पक्षकार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे विडी कामगारांची युनियन, संगमनेर - अकोले- सिन्नर या भागात विडीधंदा जोरात होता. रामभाऊ नागरे, भाऊसाहेब थोरात आणि पांडुरंग भांगरे हे या विडी कामगारांचे नेते. अण्ण आणि आठरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत. वाढीव मजुरीसाठी विडीकामगारांनी संप पुकारला. त्या भागातील विडीकामगारांचा हा पहिलाच संप. हे कामगार अगदी गरीब आणि हातावर पोट असलेलेच होते. तरीही महिनाभर त्यांनी मोठ्या जिद्दीने संप टिकवला. मग मात्र मालकवर्गाच्या आडमुठेपणामुळे आणि पोलिसांच्या दडपशाहीमुळे संप मोडला गेला. अनेक कामगारांना मालकांनी पुन्हा कामावर घेतलेच नाही. या संपानंतर अण्णासाहेबांनी एक अभिनव प्रयोग करण्यात पुढाकार घेतला. बेकार झालेल्या कामगारांना एकत्र आणून त्यांनी सहकारी तत्त्वावर चंदनापुरी या गावी विडी कारखाना काढायची योजना आखली. कामगारांनीच त्यासाठी भांडवल गोळा करायचे आणि कामगारांनीच कारखाना चालवायचा असे ठरले. इथूनतिथून थोडेफार पैसेही गोळा केले गेले. तंबाखूची खरेदीही केली गेली. सरकारकडे अर्ज करून 'सहकार' हा ट्रेडमार्कही मिळवला गेला. विड्या बांधायला कामगारांनी कुठे, कधी बसायचे याची तजवीज झाली; उत्पादनही सुरू झाले. दुर्दैवाने अण्णासाहेबांना वा सोबतच्या कोणालाच धंदा कसा करायचा हे अजिबातच ठाऊक नव्हते, त्यांच्या घराण्यात कधीच कोणी धंदा केला नव्हता. कामगारांनी नुसते वस्तूंचे उत्पादन करून भागत नाही तर त्यांची विक्रीही करावी लागते, त्वमेव बंधुः सखा त्वमेव... २१७