पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९३७च्या फेब्रुवारीमध्ये भारतात प्रथमच असेंब्लीच्या निवडणुका जाहीर झाल्या. राष्ट्रसेवादलातही ते सक्रिय होते. देशातील ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याने लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. एका अर्थाने ही स्वराज्याची चाचणीच होती. राष्ट्रीय नेते प्रांताप्रांतांत प्रचारदौरे काढत होते. पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्याकाळी असेंब्लीचे मतदारसंघ बरेच मोठे असत. उत्तर नगर मतदारसंघात श्रीरामपूरचे रामभाऊ गिरमे हे काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते. त्यांच्याच प्रचारार्थ संगमनेरला पंडितजींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे एक अधिकृत स्वयंसेवक म्हणून अण्णासाहेबांची नेमणूक झाली होती. देवठाण हे त्यांचे प्रचारक्षेत्र होते व पक्षातर्फे त्यांना सायकलचे भाडे द्यायची तजवीज झाली होती. काँग्रेसचा झेंडा लावलेल्या सायकलवरून ते त्या परिसरात सतत फिरत असत. पंडितजींच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी इतर अनेकांप्रमाणे त्यांनीही खूप कष्ट घेतले होते. पंडितजी सुमारे वीस-पंचवीस मिनिटे बोलले व अत्यंत संस्मरणीय अशी ती सभा झाली. या सभेनंतर अण्णासाहेबांनी खादीचे कपडे घालायला सुरुवात केली आणि काँग्रेसचा एक स्वयंसेवक म्हणून मोठ्या अभिमानाने ते स्वातंत्र्यचळवळीतही भाग घेऊ लागले. मॅट्रिकनंतर त्यांनी मुंबईतल्या चौपाटी येथील विल्सन कॉलेजात प्रवेश घेतला. ज्या अमेरिकन मिशनने पुढे अहमदनगर कॉलेज सुरू केले त्याच अमेरिकन मिशनचे हे विल्सन कॉलेज होते. त्या अहमदनगर कॉलेजचे संस्थापक प्राचार्य डॉ. बाप्पा हिवाळे हेही पूर्वी याच विल्सन कॉलेजात शिकवत होते. तेथून मग बडोद्याला महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या कॉलेजात अण्णासाहेब गेले. तिथे हॉस्टेलची सोय अधिक चांगली व मोफत होती. कॉलेज फीही माफ होती. पुढे बेचाळीसची चळवळ सुरू झाल्यावर त्यावेळी ज्युनिअर बी.ए. च्या वर्गात असलेल्या अण्णासाहेबांनी शिक्षण अर्धवट सोडून चळवळीत उडी घेतली. १९४२ ते १९४४ या कालावधीत अण्णासाहेब दोन वर्षे नाशिकच्या तुरुंगात होते. तुरुंगातून बाहेर पडले ते कम्युनिस्ट बनूनच. त्यांच्याबरोबर तुरुंगात असलेले एक राजबंदी अहमदाबादला कापडाचे व्यापारी होते. त्यांचे नाव जसवंत मेहता. 'माझ्या दुकानात तुम्ही हिशेबाचे काम बघा; त्यातून तुमच्या राहण्याखाण्याचा व शिक्षणाचा खर्च निघेल. त्याचवेळी तुम्हांला लॉदेखील करता येईल,' असा प्रस्ताव मेहतांनी मांडला. अण्णासाहेबांना तो पटला व ते अहमदाबादला गेले. तिथल्या लॉ कॉलेजातून त्यांनी एलएल.बी. चे पहिले वर्ष पूर्ण केले. पण त्यानंतर घराजवळ राहावे म्हणून त्यांनी अहमदाबाद सोडले व अजुनी चालतोची वाट... २१६