पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अण्णासाहेबांची पूर्वी कधी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. त्यांच्याकडे बघून वदूदना एकसारखी रावसाहेबांची आठवण येत होती; मधली काही वर्षे त्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध उरला नव्हता. शेवटी अगदी न राहवून वदूदनी विचारले, "कम्युनिस्ट चळवळीत माझ्याबरोबर रावसाहेब नावाचा एक तरुण होता. अगदी हुबेहुब तुमच्यासारखाच दिसणारा. तुम्हांला त्याची काही माहिती आहे का ?” अण्णासाहेबांना एकदम आश्चर्य वाटले; वदूद व रावसाहेब यांच्या मैत्रीची त्यांना पूर्वकल्पना नव्हती. "तो माझा सख्खा धाकटा भाऊ आहे!" आनंदाने हसतहसत त्यांनी खुलासा केला. लगेचच वदूदनी रावसाहेबांना पत्र लिहून हा प्रसंग कळवला व दोघांमधल्या खंड पडलेल्या मैत्रीला पुन्हा चालना मिळाली. असाच एक प्रसंग दिल्लीतला. काही कामानिमित्त रावसाहेब दिल्लीला गेले होते. लोकसभेतल्या प्रेक्षक-गॅलरीत बसले होते. आपल्या विनोदी वृत्तीकरिता प्रसिद्ध असलेले स्वतंत्र पक्षाचे खासदार पिलू मोदी यांनी रावसाहेबांना पाहिले. दोघांमधल्या साम्याचे त्यांना आश्चर्य वाटले. वर गॅलरीत बसलेल्या रावसाहेबांकडे बोट दाखवत मोदी अण्णासाहेबांना म्हणाले, "शिंदे, मी तुला आज एक गंमत दाखवतो बघ ! तो बघ वर, दूसरा अण्णासाहेब शिंदे बसला आहे!" स. का. पाटील तेव्हा केंद्रीय अन्नमंत्री होते. गॅलरीतल्या रावसाहेबांना बघून तेही अण्णासाहेबांना त्या दिवशी असेच म्हणाले होते! संध्याकाळी घरी आल्यावर सर्वांना अण्णासाहेबांनी हा प्रसंग सांगितला आणि एकच हशा पिकला ! आणि दोन बंधूंमधले हे साम्य फक्त दिसण्यापुरते सीमित नव्हते; त्यांच्या स्वभावामध्ये आणि वृत्तीमध्येही असेच साम्य होते. राजाराम बापू पाटील महाराष्ट्राचे महसूलमंत्री होते तेव्हाची एक आठवण सांगण्यासारखी आहे. अण्णासाहेबांच्याच विनंतीवरून ते एकदा श्रीरामपूरला आले होते; बिनशेतीच्या प्रश्नावर जप्त झालेल्या श्रीरामपूरच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी. "अण्णाभाऊ तुमच्याबरोबर असायला हवे होते," असे रावसाहेब त्यांना म्हणाले. त्यावर राजारामबापू उत्तरले, " तुम्ही मंत्री नाही एवढा एक मुद्दा सोडला, तर मला तुमच्यात आणि अण्णासाहेबांच्यात काहीच फरक दिसत नाही. तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर आहात म्हणजे अण्णासाहेबच माझ्याबरोबर आहेत, असंच मी समजतो. " " अण्णासाहेबांचे पाडळीतले बालपण हे रावसाहेबांच्या तेथील बालपणापेक्षा फारसे वेगळे नव्हते. दोन्ही भावांना जातिधर्मनिरपेक्षतेचा वारसा आपल्या वडलांकडूनच मिळाला होता. या संस्कारामुळेच दादासाहेब रूपवतेंसारख्या दलिताला अण्णासाहेब आपला जिवलग मित्र मानू शकले आणि अनिल या आपल्या मुलाबरोबर लग्न अजुनी चालतोची वाट... २१४