पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पण कूळ कायद्याच्या सर्व केसेस रावसाहेबांवरच सोपवायचे अण्णाभाऊंनी ठरवले होते. त्यामुळे हे सगळे पक्षकार रावसाहेबांकडे येऊ लागले. विश्वास ठेवणे अवघड जाईल, पण एका एका दिवशी त्यांच्या डायरीवर कूळ कायद्याच्या वीस पंचवीस, तीस अशा केसेस असायच्या. कूळकायद्याच्या श्रीरामपुरातील एकूण खटल्यांपैकी ७० ते ८० टक्के काम एकट्या त्यांच्याकडे होते. कधी प्रकृतीच्या वा कौटुंबिक कारणामुळे रावसाहेबांना एखाद्या दिवशी कोर्टात जाणे अशक्य झाले, तर त्या दिवशी श्रीरामपूर कोर्टाचे काम जवळजवळ ठप्पच असायचे. इतके असूनही रावसाहेबांनी आपली फी खूप माफक ठेवली होती. नोटीस मुदतीत दिलेली नाही किंवा अर्ज मुदतीत केलेला नाही असे काही तांत्रिक दोष असले तर ती केस साक्षी पुराव्याची गरज न पडता लगेच निकाली निघत असे. अशावेळी पक्षकाराने दिलेल्या फीपैकी फक्त दहा किंवा पंधरा रुपये ठेवून बाकी पैसे ते पक्षकाराला परत देत असत. केस साक्षीपुरावे घेऊन चालवावी लागल्यास व त्यासाठी तारखा पडत गेल्यास त्यांची संपूर्ण केससाठीची फी पन्नास रुपये अशी अगदी माफक ठरलेली असे; इतरत्र आकारली जाणारी फी खूपच जास्त असे. हळूहळू कूळकायद्यातील तज्ज्ञ वकील म्हणून रावसाहेबांचा बोलबाला राज्यभर पसरला. मोहळाभोवतीच्या मधमाश्यांसारखी पक्षकारांची गर्दी त्यांच्याभोवती घोंघावू लागली; प्रशस्त ऑफिस पक्षकारांनी खच्चून भरू लागले. खूपदा ऑफिसात जागा नसल्याने समोरच्या व्हरांड्यात आणि शेजारच्या पॅसेजमध्येही पक्षकार थांबलेले असायचे. एखादा पक्षकार दारात कधी येतो आहे याची वाट पाहत बसण्याचे दिवस आता संपले होते. वकिलीतला उमेदवारीचा काळ संपून बहराचा काळ सुरू झाला होता. - अजुनी चालतोची वाट... २१२