पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढे रावसाहेबांचे कोल्हापुरातील एका प्रतिष्ठित घराण्यातल्या शशिकला शेकदार यांच्याबरोबर लग्न झाले व त्यानंतर त्यांनी आपल्या संसाराला याच टेकावडे बिल्डिंगमध्ये सुरुवात केली. बाहेरच्या खोलीत ऑफिस आणि मागच्या दोन खोल्यांमध्ये निवास. तिन्ही खोल्या खूप प्रशस्त व हवेशीर असल्याने व ही बिल्डिंग शहराच्या अगदी मोक्याच्या जागी असल्याने काही गैरसोय व्हायचा प्रश्नच नव्हता. सुदैवाने सुमनभाई शाह यांच्यासारखे सज्जन व प्रेमळ शेजारीही या बिल्डिंगीत मिळाले. दोन्ही कुटुंबांमध्ये खूप घरोबा होता आणि आता साठ वर्षांनंतरही तो बऱ्यापैकी टिकून आहे. आयुष्याची नऊ वर्षे रावसाहेबांनी या टेकावडे बिल्डिंगीत काढली. विखे पाटलांच्या जागेत जेव्हा रावसाहेबांनी स्वतःच्या स्वतंत्र अशा वकिली व्यवसायाला सुरुवात केली, त्यावेळी त्यांना एखादा पक्षकार कधी दारात येतो याची प्रतीक्षा करत बसावे लागे. कधीतरी एखादी नोटीस पाठवायचे किंवा क्वचित प्रसंगी एखाद्या लहानशा दाव्यातले प्रतिवादीचे काम मिळे. कामासंबंधीची नोंद ते आपल्या डायरीत रोज करत असत. सुरुवातीला रोजचे उत्पन्न दोन-पाच रुपयेच असायचे; पण ते लौकरच वाढू लागले. या व्यवसायवृद्धीला बऱ्याच प्रमाणात पूर्वी वर्णन केलेली श्रीरामपुरातली विशिष्ट सामाजिक परिस्थिती जबाबदार होती. खंडाने जमिनी द्यायचे प्रकार श्रीरामपुरात प्रचंड प्रमाणावर झाले होते. आपापल्या जमिनी कारखान्यांकडून परत मिळाव्यात म्हणून अक्षरश: शेकडो खंडकऱ्यांनी कोर्टात खटले दाखल करायला सुरुवात केली. त्यात 'मुंबई कूळ कायदा' या कायद्यात १९५६ च्या सुमारास केल्या गेलेल्या मूलभूत दुरुस्त्यांमुळे एकाएकी मोठी भर पडली. ह्या दुरुस्त्या इतक्या व्यापक होत्या, की जणू काही नवीनच कूळ कायदा अस्तित्वात आला होता. या सुधारित कायद्यानुसार जमीन मालकांनी कुळाला विशिष्ट तारखेच्या आत नोटीस देऊन आपल्या जमिनीच्या कबज्याची मागणी करायची होती. त्यासाठी टेनन्सी कोर्टात केस दाखल करणे आवश्यक होते. ज्या जमिनी सुटून मिळणार नाहीत, त्या 'कसेल त्याची जमीन' या न्यायाने कुळाच्याच मालकीच्या होणार होत्या. जमीन मालकाने ३१ डिसेंबर १९५६पूर्वी कुळाला नोटीस देणे व ३१ मार्च १९५७पूर्वी टेनन्सी कोर्टात अर्ज दाखल करणे या कायदा दुरुस्तीनुसार अत्यावश्यक होते. आपली जमीन सुटून मिळावी व वेळेत नोटीस जावी यासाठी जमीनमालकांची प्रचंड धावपळ सुरू झाली. अण्णाभाऊ श्रीरामपुरातले सर्वांत मोठे वकील होते. साहजिकच सगळे पक्षकार आधी त्यांच्याकडेच जाऊ लागले. दिवस काळ्या कोटाचे... २११