पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आतिथ्यधर्माचे धडेही त्यांना यातून मिळाले. वडलांप्रमाणेच बाईंकडून, म्हणजे आपल्या आईंकडूनही, रावसाहेब खूप काही शिकले. फारसे न बोलणाऱ्या पण सतत काही ना काही कामात असणाऱ्या, सगळ्यांचे मायेने करणाऱ्या अशा त्या आई नावाप्रमाणेच आनंदभाविनी होत्या. तशा निरक्षर होत्या पण एक उपजत असे शहाणपण त्यांच्यात होते. आपल्या शेतावर काम करणाऱ्या गड्यांना शेतमालकांनीच जेवण द्यायचा रिवाज त्या काळी होता; काही ठिकाणी तो आजही आहेच. हे जेवण म्हणजे एका दृष्टीने पगाराचाच एक भाग असे. त्यावेळी लक्ष्मीआई (म्हणजे रावसाहेबांच्या आजी) प्रत्येक गड्यामागे दोन भाकन्या असा हिशोब पकडत, पण प्रत्यक्ष वाटप करताना बाई गड्यांना गुपचूप जास्त भाकऱ्या वाढत असत. " इथे घरदार नसलेली, कामाचा गाडा ओढणारी ती गरीब माणसं आहेत. त्यांची भूक भागली पाहिजे,' ही बाईंची भावना असायची आणि सासूबाईंच्या अपरोक्ष त्या ती बोलूनही दाखवत }} असत. वंचितांविषयी आईला असलेल्या उपजत कळवळ्याचे एक आणखी उदाहरण देताना रावसाहेब सांगतात, "पंढरीनाथ शिंदे हा माझा एक चुलत चुलत भाऊ. शेजारीच राहायचा. माझ्यापेक्षा दोन-एक वर्षांनी धाकटा. त्याची आई लहानपणीच वारली होती. घरात काहीही गोडधोड केलं, की बाई प्रथम पंढरीला हाका मारून बोलवायची व तो आल्यावरच मग त्याच्याबरोबर आम्हांला खायला द्यायची. आम्हीही लहानच होतो; आईने केलेलं खायला आतुर असायचो. साहजिकच पदार्थ तयार असला तरीही बाई आपल्याला आधी खायला देत नाही याबद्दल आम्ही बहीण भाऊ नाराज व्हायचो. तेव्हा बाई म्हणायची, 'अरे, पंढरी हे आईविना लेकरू आहे. आपणच त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याला जीव लावला पाहिजे.' अशा तऱ्हेने बाईने पंढरीवर आम्हां सख्ख्या मुलांपेक्षा अधिक माया केली. पुढे पंढरीनाथ शिंदे हे अॅडव्होकेट झाले. " काहीसा असाच दुसरा एक प्रकार. यथावकाश रावसाहेब व थोरले बंधू अण्णासाहेब अॅडव्होकेट झाले त्यानंतरचा. ह्या परिसरातले सुरुवातीचेच ॲडव्होकेट असल्याने दोघे चांगल्यापैकी पैसे मिळवू लागले. पण त्यांचे सर्वांत थोरले बंधू पाटीलभाऊ हे मात्र शिक्षण अर्धवट सोडून पाडळी गावातच राहिले. त्यांचा प्रपंच शेतीवरच चालला होता. शिवाय त्यांना मुलेही बरीच होती. साहजिकच त्यांची आर्थिक ओढाताण होत असे. अशा स्थितीत बाईंचा आपुलकीचा, कळवळ्याचा ओढा त्यांच्याकडेच असे. पाटीलभाऊ कधीकधी राग यावा असे वागत. तरी अजुनी चालतोची वाट... २०