पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोर्टात जात. कोर्ट त्यावेळी मामलेदार कचेरीच्या इमारतीतच होते. अण्णाभाऊंचे घर ते कोर्ट हे अंतर सुमारे दीड किलोमीटर होते. संध्याकाळी कोर्ट संपल्यावर रावसाहेब आधी टेकावडे बिल्डिंगीतील आपल्या ऑफिसात जात, तिथले सगळे काम उरकून पुन्हा घरी जात, कपडे बदलत, अण्णाभाऊंच्या ऑफिसात जाऊन तिथले उरलेले काम संपवत आणि मग रात्री घरी गेल्यावर जेवण व झोप. विशेष म्हणजे ही सगळी ये-जा ते रोज पायीच करायचे. एकूणच पायी प्रवास करणे हे तेव्हा सर्रास व्हायचे. आज मात्र एखादा वकील इतकी पायपीट करणे अशक्यच वाटते. ह्या सगळ्या धावपळीत खूपदा जेवायलाही पुरेसा वेळ मिळत नसे. वकिलीबरोबरच अण्णाभाऊंचा सहकारी आणि सामाजिक क्षेत्रांतही खूप वावर होता. साहजिकच आपल्या कोर्टातील केसेसना उपस्थित राहणे त्यांना जमत नसे. अशा वेळी मुदत मागून घेण्यासाठी किंवा केस चालवण्यासाठी ते रावसाहेबांनाच सांगत. ही गोष्ट काही पक्षकारांच्या लक्षात आली होती. एकदा एका पक्षकाराचा महत्त्वाचा दावा होता. तो पक्षकार अण्णाभाऊंना उद्देशून म्हणाला, "भाऊसाहेब, तारीख मात्र तुम्हीच चालवा बरं का! माझी अगदी हात जोडून तशी विनंती आहे. नाहीतर द्याल तुमच्या भावाला पाठवून!" रावसाहेब तेव्हा समोरच बसले होते. अण्णाभाऊंनी फक्त एक स्मित करून त्या पक्षकाराला दिलासा दिल्यासारखे केले. पक्षकाराचे बोलणे रावसाहेबांना साहजिकच थोडेसे खटकले, पण पक्षकाराच्या भावना ते समजू शकत असल्याने त्याच्या बोलण्याचा रावसाहेबांना राग मात्र मुळीच आला नाही. आपण व्यवसायात नवीन आहोत व त्यामुळे पक्षकार अण्णाभाऊंइतका विश्वास आपल्यावर ठेवणे सुरुवातीला तरी शक्य नाही हे त्यांनी मनोमन स्वीकारले होते. पण त्याचबरोबर एक उत्तम वकील म्हणून स्वबळावर प्रस्थापित व्हायचा निर्धार मात्र दृढ होता. १९४२ ते १९५२ अशी जवळपास दहा वर्षे त्यां राजकीय आणि सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले होते; प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या होत्या. यांतली तीन वर्षे तर त्यांनी भूमिगत म्हणूनच काढली होती. जीवनातील आर्थिक स्थैर्याचे महत्त्व म्हणूनच त्यांनी पुरेपूर जाणले होते. आणि हे स्थैर्य आपल्याला फक्त यशस्वी वकील बनूनच मिळवता येईल याची खूणगाठ त्यांनी मनाशी पक्की बांधली होती. सुरुवातीच्या या दिवसांमध्येच एक गोष्ट रावसाहेबांना प्रकर्षाने जाणवली. ते लिहितात, "कॉलेजमध्ये झालेले कायद्याचे शिक्षण हे प्रत्यक्षात व्यवसायासाठी मुळीच दिवस काळ्या कोटाचे... २०९