पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असतानापासून दोघांचा संबंध होता. पुढेही त्यांच्याशी सातत्याने संपर्क राहिला. पण विखे पाटलांच्या जागेत रावसाहेबांना फार दिवस राहावे लागले नाही; त्याहून खूपच चांगली भाड्याची जागा लौकरच त्यांना मिळाली. ही जागा म्हणजे टेकावडे बिल्डिंगीत चंदनापूरकर वकील वापरत होते ती. श्रीरामपूरहून बदली झाल्यानंतरही टेकावडे बिल्डिंगीतली ती जागा चंदनापूरकरांनी तशीच आपल्या ताब्यात ठेवली होती. श्रीरामपुरात अगदी मोक्याच्या जागी असलेली ती बिल्डिंग जनार्दन टेकावडे यांच्या मालकीची होती. टेकावडे हे श्रीरापुरातले एक अतिशय समृद्ध असे कुटुंब होते. त्याच बिल्डिंगीत तळमजल्याला त्यांचे अडत्याचे दुकान होते. आपली जागा रिकामी करून मिळावी म्हणून त्यांनी चंदनापूरकरांना नोटीस पाठवली आणि योगायोग म्हणजे रावसाहेबांमार्फत त्यांनी ही नोटीस दिली. खरेतर ही नोटीस पाठवणे रावसाहेबांना फारसे रुचले नव्हते; कारण नुकतेच त्यांनी चंदनापूरकरांच्या हाताखाली थोडे दिवस काम केले होते. पण व्यवसायाचा एक भाग म्हणून त्यांच्यावर तो प्रसंग आला होता. नोटिशीचा परिणाम होऊन जागा खाली होऊन मिळाली. रावसाहेबांनीच ती जागा आता घ्यावी असा टेकावडेंनी आग्रह धरला. या तुलनेत विखे पाटलांनी दिलेली जागा लहान होती. इथे उजेडवारा भरपूर होता, तीन प्रशस्त खोल्या होत्या, शिवाय मोठा पॅसेज व व्हरांडा होता आणि मासिक भाडे फक्त ३६ रुपये; म्हणजे जागेच्या तुलनेत खूपच वाजवी होते. साहजिकच रावसाहेबांनी आपले ऑफिस तिथे हलवायचे ठरवले. · विखे पाटलांच्या जागेची किल्ली त्यांच्या ताब्यात परत देताना रावसाहेबांनी त्यांना भाड्यापोटी म्हणून एक चेक दिला. पण "तुला काय भाड्यासाठी मी ती जागा दिली होती काय ?" असे म्हणत विखे पाटलांनी तो चेक हाती आल्याक्षणी फाडून टाकला. रावसाहेब म्हणतात, "स्वत:हूनच ती जागा मला देताना आणि मी दिलेला चेक फाडून टाकताना त्यांनी माझ्याविषयी दाखविलेली सद्भावना माझ्या सदैव स्मरणात राहिलेली आहे." • टेकावडे बिल्डिंगीतील प्रशस्त जागेचा कार्यालय आणि निवास या दोन्हीसाठी उपयोग होण्यासारखा होता. पण रावसाहेब फक्त कार्यालयासाठी तिथली बाहेरची खोली वापरू लागले; कारण त्यांच्या निवासाची सोय अण्णासाहेबांच्या घरी होतीच. सकाळी उठल्याउठल्या आधी रावसाहेब अण्णासाहेबांच्या घरून अण्णासाहेबांच्या ऑफिसात जात. तेथील काम उरकून मग टेकावडे बिल्डिंगीतील आपल्या कार्यालयात येत. तेथील काम उरकून मग जेवणासाठी पुन्हा अण्णाभाऊंच्या घरी जात. जेवण झाल्यावर सूटबूट आणि कोर्टाचा काळा डगला चढवून ते अजुनी चालतोची वाट... २०८