पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४५ या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड झाली होती. त्याचप्रमाणे उसामुळे शेती किफायतशीर बनू लागली होती व त्यामुळे खंडाची जमीन आपल्याला परत मिळावी व कारखान्याऐवजी आपण स्वतःच ती जमीन कसू ही भावनाही लोकांच्या मनात निर्माण झाली होती. जमीन खंडाने द्यायच्या कराराची विशिष्ट वर्षांची मुदतही आता संपली होती किंवा संपत आली होती. हळूहळू या प्रश्नावरून वातावरण तापत गेले. हातातल्या जमिनी शेतकऱ्यांकडे परत द्यायला कंपन्यांचा अर्थातच विरोध होता. खंडकरी (म्हणजे ज्यांनी खंडाने स्वतःच्या जमिनी दिल्या होत्या अशा) शेतकऱ्यांनी संघटित होऊन यासाठी चळवळ उभारली. या लढ्यात शेतकरी महिलाही मोठ्या प्रमाणावर सामील झाल्या ही विशेष नमूद करण्यासारखी बाब. सभा- मोर्चे यांना सुरुवात झाली. बेलापूर शुगरसाठी सरकारनेच ज्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या ते शेतकरी तर देशोधडीलाच लागले होते; सरकारनेच दरोडा घालावा असे काहीसे त्यांच्या बाबतीत घडले होते. आणि ज्यांनी महाराष्ट्र शुगरला खंडाने जमिनी दिल्या होत्या त्यांच्यापैकीही काही शेतकऱ्यांच्या भावना खूपच तीव्र होत्या; कारण अनेकांनी आपल्या जमिनी राजीखुशीने खंडावर दिल्या नव्हत्या; जवळपास बळजबरीने त्यांना करारपत्रांवर सह्या करायला लागल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर ऊस लावायचा म्हणजे यंत्रांचा वापर शेतीकामात होणे अपरिहार्य होते; आधुनिक शेतीव्यवस्थापनासाठीही जमिनीचे मोठे आकारमान आवश्यक होते. 'इकॉनॉमी ऑफ स्केल' हे तत्त्व शेतीलाही लागू होते. झाले होते असे, की अनेक छोट्या छोट्या शेतकऱ्यांकडून या जमिनी खंडाने घेतल्या गेल्या होत्या व त्यामुळे ती जमीन सलग अशी नव्हती. मधूनमधून अशीही अनेक शेते होती ज्यांचे मालक खंडाने आपली जमीन द्यायला तयार नव्हते. अशा जमिनी धाकदपटश्यानेही ताब्यात घेतल्या गेल्या होत्या. इथे हेही नमूद करायला हवे, की खंडकऱ्यांचा प्रश्न हा फक्त या दोन बड्या कारखान्यांपुरता सीमित नव्हता; इतरही अनेक बडे बागाईतदार होते ज्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी खंडाने घेतल्या होत्या व आता खंडाची मुदत संपल्यावरही मूळ मालकांना त्या जमिनी परत करायला हे बागाईतदार तयार नव्हते. जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व आणि स्थानिक प्रशासन यांच्यावर या बड्या बागाईतदारांचा खूप प्रभाव होता व त्यामुळे छोटेछोटे पीडित शेतकरी हवालदिल झाले होते. अण्णासाहेबांनी या प्रकरणात लक्ष घालायला सुरुवात केली. त्यांच्या स्वभावाप्रमाणे आधी त्यांनी सगळ्या परिस्थितीचा खोलात जाऊन अभ्यास केला आणि मग वेगवेगळ्या खंडकऱ्यांच्या नावाने शेकडो नोटिसेस या दोन्ही कारखान्यांना अजुनी चालतोची वाट... २०६