पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तयार होऊ लागली. या साखरेला परदेशातही खूप मागणी होती. त्यामुळे स्वत:च्या जमिनीवरील उसाबरोबरच आसपासच्या शेतकऱ्यांकडूनही ऊस खरेदी करायला या कंपन्यांनी सुरुवात केली. नंतर करमशी सोमय्या, मोरारका यांच्यासारख्या उद्योगपतींनी इतरही काही खासगी कारखाने सुरू केले. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारीची ही सुरुवात होती. त्यामुळे उसाला प्रचंड मागणी आली; ऊस हे नगदी पीक (क्रॅश क्रॉप) बनले ते या काळात. बेलापूर रोड परिसराचा यातून झपाट्याने विकास होऊ लागला. ऊस लावणारे गुहाळही चालवत. त्या गुळाची मोठी बाजारपेठ बनली. पुढे साखरेचाही व्यापार खूप वाढला. लोकांच्या हाती कधी नव्हे तो रोख पैसा खेळू लागला. लोकांप्रमाणे सरकारच्याही दृष्टीने ही उसाची शेती फायद्याची होती. भंडारदरा धरण आणि त्यातून प्रवरामार्गे काढलेले कालवे यांवर प्रचंड गुंतवणूक सरकारने केली होती. पाणीपट्टीद्वारे महसूल वाढला व त्यातून गुंतवणुकीवर केलेला खर्चही भरून निघू लागला. चांगले बियाणे, खते व यंत्रसामग्री वापरात आली. त्यातून उत्पन्न आणखी वाढले. दारिद्र्याचे दुष्टचक्र भेदून आता समृद्धीचे चक्र फिरू लागले. उसामुळे पाणी खूप वापरले जाते, इतर धान्योत्पादन कमी होते, जमिनीचा कस कमी होतो, 'साखर की भाकर' हाच यक्षप्रश्न आज महाराष्ट्रापुढे उभा आहे अशा स्वरूपाची सार्वत्रिक टीका गेली काही वर्षे होत आली आहे. अशी टीका करणारे दोन गोष्टी विचारात घेत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे, पाण्याचा शेतीतील वापर किफायतशीर व्हावा म्हणून सरकारनेच जवळजवळ तीस वर्षे शेतकऱ्यांनी उसाकडे वळावे म्हणून खूप प्रयत्न केले होते, त्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी उत्तेजन दिले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे, पिढ्यान्पिढ्या दारिद्र्यात खितपत पडलेल्या शेतकऱ्यांच्या हाती उसामुळेच आयुष्यात प्रथम पैसा येऊ लागला. त्यामुळे आता त्याच ऊसलागवडीपासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्याचे वेगवेगळ्या गटांकडून होत असलेले प्रयत्न हे सर्वसामान्य शेतकऱ्याला गोंधळात पाडणारे आहेत. आर्थिक समृद्धीचाच एक आविष्कार म्हणजे पूर्वी फक्त एकच छोटेसे हनुमानाचे मंदिर असलेल्या त्या परिसरात अनेक मंदिरे उभारली गेली. सय्यदबाबांचा दर्गा आला, कॅथॉलिकांचे चर्च आले, शिखांचे गुरुद्वारा आले, दिगंबर जैनांचे देरासर आले, माळी समाजाचे सावता मंदिर, शिंपी समाजाचे नामदेव मंदिर, कासार समाजाचे कालिका मंदिर, सुवर्णकार समाजाचे संत नरहरी मंदिर, कुंभार समाजाचे संत गोरा कुंभार मंदिर अशी असंख्य मंदिरे आली. भक्त हनुमानाच्या पाठोपाठ स्वामी श्रीरामाचेही भव्य, संगमरवराचे मंदिर आले. हणमंतराव गिरमे यांनी त्यासाठी · अजुनी चालतोची वाट... २०४