पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होऊ लागली. रावसाहेब गेली अनेक वर्षे जिथे राहतात तो वॉर्ड नंबर सातमधील महादेव मळा म्हणजे हीच जमीन. त्याकाळी रेल्वेने तांदळाची जा- ये व्हायची. ती हेरून डावखरांनी तांदळाचा व्यापार सुरू केला. हीच आजच्या श्रीरामपूरच्या बाजारपेठेची सुरुवात होती. एकूणच श्रीरामपूर गाव वसवण्याची सुरुवात डावखर यांनी केली असे म्हटले तर ते फारसे चूक होणार नाही. १९२०च्या सुमारास डेक्कन इरिगेशन सिस्टिम सुरू झाली. भंडारदरा धरणाचे १५० किलोमीटर्स अंतरावरील पाणी प्रवरा डाव्या कालव्यातून श्रीरामपूर व बेलापूर रोड परिसरात पोचले. पण त्या पाण्याचा फारसा उपयोग होत नव्हता. श्रीरामपुरातील एक ज्येष्ठ व्यापारी सुमनभाई शाह म्हणतात, "स्थानिक शेतकरी पाटाचे पाणी घेऊन शेती करणे हे पाप समजत. शेती ही फक्त पावसाच्या पाण्यावर करायची हे त्यांचे ठाम मत. सरकार त्याकाळी शेतकऱ्यांना 'पाणी घ्या, पाणी घ्या' असे विनवून, विनवून थकले होते. शेवटी सरकारने प्रयत्नपूर्वक बाहेरून मराठा व माळी समाजातील जगताप, गिरमे, बघे, ससाणे, ढाकले आदी मंडळी, त्यांनी तेथे शेती सुरू करावी व पाण्याचा योग्य तो वापर व्हावा, म्हणून आणली. " या मंडळींना 'पुणेकर' म्हणूनच ओळखले जाई. त्यांनी या भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी घेतल्या. पण त्या काळी शेतीमालाला अतिशय मंदी होती. पाणी उपलब्ध असूनही शेतकरी ते पिकासाठी घेऊ शकत नव्हता, कारण पाणी घेतले तरी पाणीपट्टी भरणे शेतकऱ्याला परवडत नव्हते. या पार्श्वभूमीवर बॅडी अँड कंपनी या १९१९ साली स्थापन झालेल्या ब्रिटिश कंपनीने त्याच सुमारास बेलापूर रोड स्टेशनपासून चार मैलांवर आपली बेलापूर शुगर फॅक्टरी सुरू केली. हॅरिसन नावाचे या कंपनीचे एक इंग्रज संचालक होते. त्यांच्या नावावरून कारखान्याच्या परिसराला हरीगाव किंवा हरेगाव असे नाव पडले. या कंपनीसाठी सरकारने जवळच्या उंदीरगाव येथील व त्या परिसरातील दहा-अकरा हजार एकर जमीन ताब्यात घेऊन (ॲक्वायर करून) दिली. त्यानंतर काही वर्षांनी साधारण १९३३च्या सुमारास मुंबईच्या राष्ट्रीय विचारसरणीच्या डहाणूकर या उद्योगपतींनी आपली महाराष्ट्र शुगर मिल्स टिळकनगर या भागात सुरू केली. टिळकनगर हे त्यांनीच आपल्या वस्तीला दिलेले नाव. या कंपनीनेही शेतकऱ्यांकडच्या जमिनी अतिशय स्वस्तात खंडाने घेतल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनीही त्या पंधरा, वीस किंवा अधिक वर्षांच्या मुदतीसाठी खंडाने दिल्या. शेतीत अजिबातच काही सुटत नव्हते; त्यामुळे ही नियमित मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही आकर्षक होती. या दोन्ही कंपन्या सुरुवातीपासूनच उत्तम चालू लागल्या. हजारो टन साखर दिवस काळ्या कोटाचे... २०३