पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करण्यात आले. रावसाहेबांना नाशिकमध्ये वकिली करणे खूप त्रासाचे होईल, त्यामुळे ते निराश होतील, त्याऐवजी इथे श्रीरामपुरात आपल्या निगराणीखाली ते चांगली प्रगती करतील असाही अण्णासाहेबांचा कयास असावा. १९५४च्या अखेरीस श्रीरामपुरात आल्यावर रावसाहेब अण्णासाहेबांकडेच राहू लागले. बेलापूर रस्त्यालगत सात्रळकर यांच्या माडीवर अण्णासाहेब राहत. तशी ही माडी तकलादूच होती. एकदा तर माडीचा कठड्याचा भाग मोडून त्यांचा दोन नंबरचा मुलगा अनिल वरून खाली पडला होता. सुदैवाने खालच्या मजल्यावर असलेल्या दुकानदाराने पत्र्याच्या झडपा बांधल्या होत्या व त्या झडपांवर अनिल आधी पडल्यामुळे तो वाचला. पण ही इमारत अगदी मध्यवर्ती अशा सोयीच्या जागी होती. सुमारे दहा- बारा वर्षे त्या पाच-सहा खोल्यांच्या जागेत अण्णासाहेब राहिले. याच जागेत रावसाहेबांचा वकिली व्यवसाय सुरू झाला. श्रीरामपूर कोर्टातील रावसाहेबांच्या कामाचे व एकूणच तिथल्या कोर्टातील कामाचे स्वरूप समजून घेण्यासाठी श्रीरामपूरची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. कारण श्रीरामपूर कोर्टातील खटल्यांचे स्वरूप आणि श्रीरामपूरचा एकूण विकास या दोन्ही बाबी परस्परांशी खूप निगडित आहेत. श्रीरामपूर गावाला जुना इतिहास असा नाहीच; तुलनेने अगदी अलीकडे वसलेले हे गाव. 'बिनवेशीचे गाव' असाही त्याचा उल्लेख केला जाई. दौंड- मनमाड रेल्वेमार्गावर बेलापूर नावाचे एक स्टेशन आहे. गंगाराम नरसू डावखर नावाचे एक बांधकाम कंत्राटदार एकदा त्या परिसरात रस्त्याचे काम करतकरत आले. पुणे ते संगमनेर आणि संगमनेर ते नेवासा अशा दोन रस्त्यांचे काम तेव्हा सुरू होते व त्या बांधकामाचा काही भाग डावखर यांना मिळाला मूळचे ते पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील शिरोली गावचे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर परत आपल्या गावी जाणे त्यांच्या जिवावर आले. कारण तिथेही आर्थिक ओढगस्त खूपच होती. त्याऐवजी बेलापूर रोडलाच स्थायिक व्हायचे त्यांनी ठरवले. रेल्वेने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जेवणखाण देणे, त्यांची रात्री-अपरात्री निवासाची सोय करणे, त्यांना बारीकसारीक माल पुरवणे अशी कामे त्यांनी सुरू केली. साधारण १९१० सालच्या आसपासचा तो काळ होता, कोरडवाहू जमिनीला फारसा काही भाव नव्हता, त्यामुळे आसपासची बरीच जमीनही त्यांनी खरेदी केली. देवकर नावाचे एक धनगर होते; त्यांच्या चराऊ कुरणात डावखरांनी विहीर खणली. विहिरीला भरपूर पाणी लागले. उत्तम शेती अजुनी चालतोची वाट... २०२ -