पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पैसे देण्यासाठी व जागा ताब्यात घेण्यासाठी ते गेले. मालकाने नाव काय लिहायचे म्हणून विचारले. "रावसाहेब पांडुरंग शिंदे," रावसाहेब म्हणाले. ते ऐकल्याबरोबर मालक एकदम विचलित झाले. जागा देता येणार नाही असे म्हणाले. "आम्हांला वाटलं, तुम्ही ब्राह्मण असाल. त्या समजुतीवर मी हो म्हणालो होतो. आता तुमच्या नावावरून समजलं की तुम्ही ब्राह्मण नाही म्हणून तुम्ही शिंदे म्हणजे कोण ?" "मराठा," रावसाहेब उत्तरले. घरमालकाने जागा द्यायला नकार दिला व अपमानित होऊन रावसाहेब परत फिरले. आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या जातिभेदाची प्रत्यक्ष झळ लागायचा रावसाहेबांचा हा आयुष्यातला पहिलाच अनुभव. अर्थात त्यांचे मन मोठे होते व या प्रसंगावरून कोणतीही कटुता त्यांनी मनात राहू दिली नाही. आणि हा जातिभेदाचा अनुभवही शेवटचाच ठरला; पुन्हा कधी असे घडले नाही. पुढे त्याच रस्त्यावर दुसरी एक जागा रावसाहेबांना मिळाली आणि त्यांचा जागेचा प्रश्न मिटला. लौकरच त्यांना आयुष्यातली पहिली केसही मिळाली. इगतपुरीच्या कोर्टातील ती एक लवाद केस होती. वाडीवऱ्हे येथील त्यांचे मेहुणे मोहन पाटील यांनी संबंधित पक्षकाराला रावसाहेबांकडे आणले होते. या केसची फी म्हणून त्यांना बारा रुपये मिळाले. त्यावेळी नाशिक- इगतपुरी जाण्यायेण्याचे बसचे तिकीट सव्वा रुपया होते व चहा दोन आणे कप मिळायचा. म्हणजे फीची रक्कम तशी साधारण बरी होती. पण त्यांचा कोर्टाचा पहिला थेट अनुभव मात्र कटू होता. ठरलेल्या तारखेला ते इगतपुरी कोर्टात गेले. केसच्या अभ्यासासाठी त्यांना मुदत पाहिजे होती. न्यायाधीश मात्र मुदत द्यायला अजिबात तयार होईनात. कोर्टापुढे उभे राहण्याची ही रावसाहेबांची पहिलीच वेळ होती. रावसाहेबांची अवस्था अगदी केविलवाणी झाली होती. शेवटी एकदाची मुदत मिळाली पण त्यासाठी खूप विनवणी करावी लागली. त्यामुळे रावसाहेब काहीसे निराश झाले. रावसाहेबांची नाशिकमधली वकिली जेमतेम दोन- तीन महिनेच चालली. कारण त्याच सुमारास श्रीरामपूरला दिवाणी (सिव्हिल) कोर्टाची स्थापना झाली आणि तिथे वकिली करत असलेल्या अण्णासाहेबांनी रावसाहेबांना तार करून बोलावून घेतले. ही सप्टेंबर १९५४मधली घटना. तोपर्यंत श्रीरामपुरात फक्त रेसिडेन्ट मॅजिस्ट्रेट वर्ग- एकचे कोर्ट होते. अशा कोर्टात फक्त फौजदारी (क्रिमिनल) खटलेच चालत. पण आता तिथे दिवाणी कोर्टही सुरू झाल्यामुळे केसेसची संख्या एकदम वाढली. आता संगमनेर, कोपरगाव, राहुरी व नेवासा या तालुक्यांमधले दिवाणी खटलेही श्रीरामपूर न्यायालयात वर्ग दिवस काळ्या कोटाचे... २०१