पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कासिम, मगर हेअर कटिंग सलूनवाला, पतंगे टेलर, भैय्या पानवाला वगैरे व्यावसायिक मित्रांचाही निरोप घ्यायला रावसाहेब विसरले नाहीत. या सगळ्यांच्यामुळे लॉ कॉलेजातली दोन वर्षे म्हणजे आयुष्यातले एक आनंदपर्व झाले होते. त्या काळी वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी केवळ पदवी घेणे पुरेसे नव्हते; बार कौन्सिलची परीक्षाही द्यावी लागे. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मगच हायकोर्टाकडून वकिलीच्या व्यवसायाची सनद मिळत असे. बार कौन्सिलची परीक्षा नोव्हेंबरमध्ये व्हायची. त्या परीक्षेची तयारी करणे या व्यतिरिक्त मे ते नोव्हेंबर १९५३ या कालखंडात दुसरे काहीच व्यवधान नव्हते. म्हणून मग त्या काळात बहि:स्थ विद्यार्थी म्हणून बी.ए. करायचे रावसाहेबांनी ठरवले. त्यानुसार त्यांनी पुणे विद्यापीठात नाव नोंदवले व एकीकडे वकिली व्यवसायाची पूर्वतयारी चालू असतानाच बाहेरून परीक्षा देऊन बी.ए. ची पदवीही पदरात पाडून घेतली. बार कौन्सिलची परीक्षा ठरल्याप्रमाणे पार पडली, यथास्थित निकाल लागला आणि शेवटी जुलै १९५४ मध्ये त्यांना मुंबई हायकोर्टाकडून सनद प्राप्त झाली. खऱ्या अर्थाने त्यांचा वकिलीचा व्यवसाय सुरू झाला. वकिलीची सुरुवात रावसाहेबांनी नाशिकमधून केली. नाशिक हा त्यांचा मूळचा जिल्हा होता. तिथे जिल्हा न्यायाधीशांचे कोर्ट होते. न्यायाधीशांची संख्याही अधिक होती. नाशिकमध्ये त्यांच्या थोड्याफार ओळखीही होत्या. त्यामुळे त्यांनी उमेदवारीसाठी (ज्युनिअरशिपसाठी) नाशिकची निवड केली. आर. डी. शिंदे नावाचे एक डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स जज्ज सेवानिवृत्त होऊन नाशकात प्रॅक्टिस करत होते. काकासाहेब वाघांनी रावसाहेबांची त्यांच्याबरोबर ओळख करून दिली. त्यांच्याच हाताखाली ज्युनिअर म्हणून काम करायला रावसाहेबांनी सुरुवात केली. आर. डी. शिंदे यांची वकील म्हणून चांगली कीर्ती होती. त्यामुळे कामही भरपूर असे. सकाळी आठ वाजताच रावसाहेब ऑफिसात पोहोचत आणि कागदपत्रे वाचणे सुरू करत. इतक्या लौकर ऑफिसात पोचायचे म्हणजे राहायची जागाही जवळच मिळायला पाहिजे. त्यादृष्टीने त्यांनी शोध सुरू केला. सुदैवाने तशी एक जागा लौकरच त्यांच्या पाहण्यात आली. हत्तीखाना रोडला एका बंगल्यातली ती खोली होती. परिसर चांगला होता, शेजारीपाजारीही उत्तम होते. मुख्य म्हणजे आर. डी. शिंदे यांच्या बंगल्यापासून व कोर्टापासून ही जागा अगदी जवळ होती. रावसाहेबांना आनंद झाला. ठरल्याप्रमाणे घरमालकाने सांगितलेल्या दिवशी भाड्याचे अजुनी चालतोची वाट... २००