पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मैत्रीचे रूपांतर पुढे नात्यात झाले. रावसाहेबांच्या धाकट्या भगिनी सिंधूताई यांच्याबरोबर दिनकररावांचे १९५९मध्ये लग्न झाले. सिंधूताई स्वतः ही उच्चशिक्षित असून योगशिक्षिकाही आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये खूप जवळीक असून त्यांनी बराच प्रवासही एकत्रित केला आहे. घरातले कुठलेही कार्य एकमेकांना विचारल्याशिवाय दोघांपैकी कोणीच करणार नाही. रावसाहेब आता राहतात त्या घराचे बांधकाम दिनकररावांनीच १९७६मध्ये केले. दिनकररावांना संपत्तीचा जराही अहंकार नाही. आपली सुटकेस स्वत: उचलून ते खूपदा एसटी स्टँडवर वा रेल्वे स्टेशनवर जातात, खूप ठिकाणी पायी फिरतात; निरपेक्ष मनाने आणि कुठेही वाच्यता न करता अनेकांना आर्थिक मदतही करत असतात. मुंबईला गेले, की रावसाहेबांचा मुक्काम दिनकररावांच्याच घरी माहिमला असतो. अगदी सख्ख्या भावांमध्ये असावी अशीच जवळीक या दोन्ही कुटुंबांमध्ये आहे आणि विशेष म्हणजे दोघांच्या पुढच्या पिढीतही ते नाते तितकेच घट्ट आहे. बघताबघता लॉचे दुसरे वर्षही संपले. शेवटच्या परीक्षेच्या वेळेला रावसाहेबांना सायनसचा खूप त्रास झाला; नाकात घालायच्या ड्रॉप्सची बाटली हाताशी ठेवूनच त्यांनी सर्व पेपर्स लिहिले. १९५३च्या मेमध्ये परीक्षेचा निकाल लागला. समाधानकारक गुण मिळवून ते एलएल.बी. झाले. लॉ कॉलेजातल्या दोन वर्षांमध्ये रावसाहेबांना अनेक मित्र जोडता आले. विस्तारभयामुळे यांतल्या केवळ काहींचाच उल्लेख या लेखनात करता आला; ज्यांच्याविषयी लिहिणे टाळावे लागले अशांची संख्या बरीच मोठी आहे. या मित्रांना भेटण्यासाठी, त्यांच्याबरोबर गप्पा छाटण्यासाठी आणि नुसताच 'टाइमपास' करण्यासाठीही भरपूर वेळ रावसाहेब त्या काळात देऊ शकले. मैत्रीचे बंध घट्ट होण्यासाठी केवळ स्वभाव मिळतेजुळते असणे पुरेसे नसते; मित्रांसाठी पुरेसा मोकळा वेळही द्यावा लागतो. औपचारिक अभ्यासाचे फारसे दडपण न घेतल्यामुळे आणि मुख्य म्हणजे गेली अनेक वर्षे चळवळीसाठी केलेली धावपळ आता थांबल्यामुळे मैत्रीसाठी आवश्यक असलेला निवांतपणा या दोन वर्षांत रावसाहेबांना लाभला. आर्थिक स्वास्थ्य हाही एक महत्त्वाचा घटक होताच. रावसाहेब लिहितात: "हे कॉलेज, विशेषत: वसतिगृह, म्हणजे जणू एक घरच वाटत होते. फार मजेत दिवस गेले. विद्यार्थिदशेत एवढी मौज, आनंद, सुख कधीच वाट्याला आले नव्हते. जणू विद्यार्थिदशेतल्या पूर्वकाळातल्या अडचणींचा वचपाच काढावा असा मी या कालावधीत राहिलो. " परीक्षा संपल्यावर आपल्या मित्रांचा निरोप घेत असताना कॅफे गुडलकचा दिवस काळ्या कोटाचे... १९९