पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वत:पेक्षा इतरांचा विचार करण्याची वडलांची हीच परंपरा दादांनी ऊर्फ पांडुरंग पाटलांनी पुढे चालू ठेवली होती. माणसांची त्यांच्या घरी नुसती रीघ लागलेली असे. काही ना काही खायला देऊन सगळ्यांचे प्रेमाने स्वागत होई. सल्लामसलतीसाठी किंवा कधी नुसत्याच गप्पा मारण्यासाठी लोक येत. यात सगळ्या जातीजमातींचे लोक असत. त्यांतलेच एक समशेरपूरचे अहमदभाई रावसाहेबांना आजही आठवतात. हे बटाट्याचे व्यापारी होते. खूप प्रवास करत. वाटेत पाडळी लागणार असेल, तर दादांच्या घरी त्यांचा हमखास मुक्काम असे. विशेषतः ते सिन्नरच्या बाजाराला जात तेव्हा. पाडळी गावात मुसलमानाचे एकही घर नव्हते, पण दादांचे घर अहमदभाईंना स्वत:चेच घर वाटे. दादाही त्यांचे आगतस्वागत अगदी मनापासून करत. म्हातारपणामुळे पुढे प्रवास अशक्य झाला तेव्हाच अहमदभाईंचे येणे थांबले. बाहेरगावचे नातेवाईक, सरकारी अधिकारी, परिसरातली राजकारणी मंडळी यांचाही राबता दादांच्या घरी नेहमी असे. गावकऱ्यांप्रमाणे व पाहुण्यारावण्यांप्रमाणे येणा-या जाणाऱ्या वाटसरूंवरही ते माया करत. त्याकाळी त्या ग्रामीण भागातला कुठलाही प्रवास सोपा नसे व पावसामुळे किंवा नदीला आलेल्या पुरामुळे जेव्हा पुढचा प्रवास अशक्य होई तेव्हा पांथस्थाला गावच्या देवळातच रात्र काढावी लागे. तिन्ही बाजूंनी डोंगर व एका बाजूला म्हाळुगी नदी असल्याने पाडळीला येणाऱ्यांची विशेषतः पावसाळ्यात खूपच गैरसोय होई. त्यांच्या जेवणासाठी त्या काळी हॉटेल्स किंवा अन्य कुठलीच सोय नसे. म्हणून रोज रात्री देवळात एक चक्कर टाकायची आणि अशा अडलेल्या प्रवाशाला आपल्या घरी आणून जेवू घालायचा दादांचा रोजचा शिरस्ता असे. अशावेळी त्या प्रवाशाने बदल्यात जवळची भाजी किंवा अन्य कुठला जिन्नस देऊ केला, तर दादा तो कधी स्वीकारत नसत; उलट आपल्या घरी न येता एखादा पाहुणा परस्पर पुढे निघून गेला तर मात्र दादांना राग येई व वाईटही वाटे. दादांचे औपचारिक शालेय शिक्षण फारसे झाले नव्हते, पण सततच्या लोकसंपर्कामुळे ते बहुश्रुत बनले होते. उदाहरणार्थ, जाण्यायेण्याच्या दृष्टीने अत्यंत दुर्गम व म्हणून अन्य जिल्ह्यांपासून काहीशा तुटलेल्या आपल्या पाडळी गावाला ते कधीकधी गमतीने 'अंदमान बेट' असे म्हणत. याचाच अर्थ जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना ब्रिटिश सरकार जिथे ठेवत असे, त्या अंदमान बेटाविषयी या पाडळी गावात राहूनही त्यांनी ऐकले होते. दादांकडे सतत माणसांची वर्दळ असायची. त्यांच्या गप्पा रावसाहेब कुतूहलाने ऐकत राहायचे. त्यामुळे लहान वयातच खूप काही शिकायला मिळाले. सामाजिक दृष्टी यायला, तसेच संभाषणकला अवगत व्हायला हे शिक्षण पायाभूत ठरले. पाडळीतल्या पाऊलखुणा... १९