पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माणसांचा गराडा असे. त्या अर्थाने ते लोकनेतेच होते. शेतीही त्यांनी उत्तम केली. दुर्दैवाने ऐन उमेदीतच वसंतराव वारले. पुरेसे आयुष्य लाभले असते तर महाराष्ट्राचे एक प्रमुख नेते म्हणून वसंतराव नक्की गाजले असते. त्यासाठी आवश्यक ते नेतृत्वगुणही त्यांच्यात होते. लॉ कॉलेजातल्या दिवसांविषयी बोलताना सविता भावे यांचाही उल्लेख करायला हवा. ज्येष्ठ सर्वोदयी नेते विनोबा भावे यांचे हे पुतणे. पूर्वी तेही कम्युनिस्ट होते. गोदूताई परूळेकरांनी त्यांना रावसाहेबांविषयी व रावसाहेबांना त्यांच्याविषयी पूर्वीच सांगितले होते. त्यामुळे पहिल्या भेटीतच दोघांची मैत्री जुळली. मराठी भाषेवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. ते कविताही करत. नाशिक - इगतपुरी परिसरातील आदिवासी भागात आपण दोघे मिळून एकत्र वकिलीचा व्यवसाय करू असा एक प्रस्ताव रावसाहेबांनी भावेंसमोर मांडला होता व त्यांना तो पसंतही होता. पण प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही. सुरुवातीला रावसाहेब त्या भागात गेले, पण नंतर लौकरच त्यांनी श्रीरामपुरात अण्णाभाऊंबरोबर व्यवसाय सुरू केला. सविता भावेंनी वकिलीचा व्यवसाय न करता आयुर्विमा महामंडळात (एल.आय. सी. मध्ये) नोकरी धरली. काही वर्षांनी ती नोकरी सोडून ते पूर्णवेळ लेखन करू लागले. मुख्यतः चरित्रलेखक म्हणून ते प्रसिद्धीला आले. १९९३ साली अण्णाभाऊ वारल्यानंतर त्यांनी लगेचच कृषिक्रांतीचे सेनानी हे अण्णाभाऊंचे चरित्र लिहिले. लॉ कॉलेजमधल्या त्या दोन वर्षांमध्येच रावसाहेबांची दिनकर वाघ यांच्याबरोबर घनिष्ठ मैत्री जुळली. अहमदनगरचे सुप्रसिद्ध वकील भाऊसाहेब कानवडे यांच्याकडे दोघांची प्रथम ओळख झाली होती. दिनकर वाघ फर्गसन कॉलेजात सायन्सला होते, पण जेवायला ते नेहमी लॉ कॉलेजच्या मेसवर जात. तिथे होणाऱ्या रोजच्या गाठीभेटींतून दोघे जीवश्चकंठश्च मित्र बनले. दिनकर यांचे आईवडील अकालीच वारले होते. त्यांना आधार होता तो त्यांचे काका काकासाहेब वाघ यांचा. काकासाहेब म्हणजे व्यापक लोकादर असलेले एक प्रतिष्ठित नाव होते. पंजाबराव देशमुख व भाऊसाहेब हिरे या तत्कालीन महाराष्ट्रातील दोघा प्रमुख नेत्यांबरोबर त्यांचा वावर होता. पुढे राजकारणात व सहकारक्षेत्रातही त्यांनी नाव कमावले. दिनकररावांनी सांगलीहून सिव्हिल इंजिनिअरिंग केले. मुंबईला काही वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली. पुढे अपार मेहनत करून त्यांनी बऱ्यापैकी पैसा व मानमरातब मिळवला. दोघांमधल्या अजुनी चालतोची वाट... १९८