पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आलेली वैचारिक प्रगल्भता विचारात घेता हे नेतेपण स्वाभाविकही होते. बघता बघता दुसरे वर्ष सुरू झाले. हॉस्टेलमध्ये आता रावसाहेबांना स्वतंत्र खोली मिळाली. अशा स्वतंत्र खोलीत फक्त एकट्याने राहायचा रावसाहेबांच्या आयुष्यातला हा पहिलाच योग. या वर्षी त्यांचे एक जुने स्नेही कॉ. चंद्रभान आठरे पाटील हेही लॉ कॉलेजात आले व त्यांनीही वसतिगृहात प्रवेश घेतला. पक्षामध्ये त्यांचे स्थान रावसाहेबांपेक्षा उच्च होते व एकूणच उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील कम्युनिस्ट पक्षाचे ते प्रमुख नेते होते. पण इथे पुण्यात विद्यार्थ्यांच्या घोळक्यात ते एक मित्र म्हणून सर्वांच्या बरोबरीनेच वावरू लागले. त्यांनी शिक्षण सोडल्याला बरीच वर्षे लोटली होती. साहजिकच एका जागी बसून अभ्यास करणे त्यांना जड जात असे. ते प्रयत्न प्रामाणिकपणे करत, पण जरा कुठे खुट्ट आवाज झाला, की त्यांची एकाग्रता ढळायची. मग ते लगेच अशा आवाजाविरुद्ध तक्रार करत. अशीच एकदा त्यांनी तक्रार केली असताना रावसाहेब हसतहसत म्हणाले, "अहो आठरे पाटील, तुमचं अभ्यासापेक्षा त्या आवाजाकडेच अधिक लक्ष असतं!" यावर आठरे पाटलांसह सगळेच मनमुराद हसले. नगरचे कॉ. पी. पी. जोशी हेदेखील पक्षामध्ये रावसाहेबांचे वरिष्ठ. चळवळीमुळे त्यांच्याही शिक्षणात बरीच वर्षे खंड पडला होता. कॉलेजच्या दुसन्या वर्षाला परीक्षेला बसण्यासाठी म्हणून तेदेखील परीक्षेपूर्वी थोडे दिवस लॉ कॉलेजात आले. पण त्यांचा अभ्यास झाला नव्हता. ऑपरेशन व इतरही अनेक अडचणी आल्या. पास होण्याची त्यांना आशाच नव्हती. त्यामुळे परीक्षेला न बसताच परत जायचे त्यांनी ठरवले. अशावेळी रावसाहेबांनी त्यांना चांगला सल्ला दिला. ते म्हणाले, "अहो, टलरने एकवीस दिवसांत फ्रान्स जिंकला होता. जेवढे राहिले आहेत तेवढे दिवस तुम्ही अभ्यास करा; तुम्ही ही परीक्षा नक्की जिंकू शकाल." त्यामुळे जोशींना बराच धीर मिळाला व विशेष म्हणजे ते ती परीक्षा उत्तीर्णही झाले. लॉ कॉलेजातील आणखी एक वर्गमित्र म्हणजे बारामतीचे वसंतराव पवार; शरद पवार यांचे वडील बंधू. ते शेतकरी कामगार पक्षाचे काम करत. रावसाहेबही डाव्या विचारांचेच होते. बघताबघता दोघांची मैत्री जुळली. त्यांचे धाकटे बंधू अप्पासाहेब त्यावेळी पुण्याला कृषी महाविद्यालयात शिकत होते. त्यांच्याबरोबर ही रावसाहेबांचा चांगला परिचय झाला. वसंतरावांना रावसाहेब दादा म्हणत. त्यांच्या बारामतीच्या घरीही रावसाहेब अनेक वेळा जात असत. तेही रावसाहेबांच्या घरी श्रीरामपूरला जात. पुढे वसंतराव एक उत्तम वकील बनले. त्यांच्याभोवती सतत दिवस काळ्या कोटाचे... १९७