पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांचे वर्णन केले आहे. लॉ कॉलेजच्या प्रसिद्धीमुळे परप्रांतातीलही अनेक विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येत. त्यातल्या आर. एस. घई यांचा विशेष उल्लेख करायला हवा. कुठल्याही परीक्षेत त्यांनी कधीही पहिला नंबर सोडला नाही. गाण्याची तसेच थट्टामस्करी करत मजेत जगण्याचीही आवड त्यांनी अभ्यासाइतकीच जोपासली. घई हे मूळचे पंजाबचे. यथावकाश चंदिगढ हायकोर्टात अतिशय निष्णात वकील म्हणून ते प्रसिद्धीस आले. पुढे २००२ साली रावसाहेब सपत्निक चंदिगढला जाऊन त्यांना भेटले; किंबहुना त्यांच्या घरीच मुक्कामही केला. एका तीन मजली वैभवशाली हवेलीत ते राहत व समाजातही त्यांना खूप मान होता व आजही आहे. आपल्या व्यवसायाला घईंनी धंदेवाईकपणाचा कधी स्पर्शही होऊ दिला नाही; सत्याचा मार्ग कधी सोडला नाही. लक्ष्मी आपल्याच पायांनी त्यांच्यापाशी चालत आली. बराच मोठ्या रकमेचा इन्कम टॅक्स ते कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता वर्षानुवर्षे भरत आले आहेत. कॉलेजचे वसतिगृहही खूप नावाजलेले होते. वसतिगृहाची इमारत देखणी आणि प्रशस्त होती. सोयी उत्तम होत्या. पुण्यातल्या इतर कुठल्याही वसतिगृहात त्यावेळी इथल्याप्रमाणे अंघोळीसाठी गरम पाणी मिळत नसे. मेसमधले जेवण अप्रतिम असे. मेसमध्ये काम करणारी किसन व परशुराम ही मुले सकाळी उठल्याउठल्या विद्यार्थ्यांची खासगी कामेही करून देत. खोल्या झाडणे, मटक्यात पाणी भरून ठेवणे, कोणी रतिबाने रोज दूध घेत असेल तर ते तापवून देणे, चहा करून देणे, खोलीत चहाच्या उष्ट्या कपबशा राहिल्या असल्या तर त्या धुऊन देणे वगैरे. ही मुले विद्यार्थ्यांचे मित्रच बनली होती. सगळे त्यांना किशा व परशा म्हणत. व्यंकटराव पै नावाचे एक गृहस्थ ही मेस चालवत. प्रत्येक बाबतीत ते जाती लक्ष घालत, विद्यार्थ्यांना प्रेमाने आग्रहपूर्वक जेवू घालत. त्यामुळे लॉ कॉलेजचे विद्यार्थी नसलेलेही अनेक तरुण जेवणापुरते या मेसमध्ये येत असत. त्यातल्या अनेकांशी रावसाहेबांची मैत्री जुळली. नगर-नाशिक जिल्ह्यातील तीस-पस्तीस विद्यार्थ्यांचा एक गट आपोआपच तयार झाला होता. डेक्कनवर कॅफे गुडलक या इराण्याच्या हॉटेलात त्यांचा अड्डा बसे. चहा आणि खारी बिस्किटे हा ठरलेला मेन्यू. इथली खारी बिस्किटे खूप फुगलेली आणि एका विशिष्ट चवीची असत. कधीकधी सगळे इथे जेवायलाही येत. पराठे आणि चिकनकरी ही इथली खासियत. हॉटेलचा मालक कासिम हा विद्यार्थ्यांचा दोस्तच बनला होता. अडीअडचणीला तो पैसेही उसने देई. रावसाहेब या गटाचे अनभिषिक्त नेतेच होते. त्यांची चळवळीची पार्श्वभूमी व त्यातून अजुनी चालतोची वाट... १९६