पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्याला आपण मित्र मानले त्याला अडचणीच्या वेळी मदत करणे, स्वत:ची सोय - गैरसोय न पाहता त्याच्यासाठी वेळ काढणे याचे मोल मोठे आहे. भावी आयुष्यातही रावसाहेब असेच मैत्रीला जागले व आज त्यांच्याविषयी जिव्हाळा बाळगणाऱ्यांची संख्या इतकी मोठी आहे त्याचे हे एक रहस्य आहे. रावसाहेबांच्या बॅचला सत्यरंजन साठे, विजयराव मोहिते, राजा भोसले, प्रभा अत्रे वगैरे सहाध्यायी होते. त्यांच्याबरोबर जुळलेली मैत्री भविष्यातही चांगली टिकून राहिली. विजयराव मोहिते पुढे पुण्यात विख्यात फौजदारी वकील बनले तर राजा भोसले मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश. डॉ. प्रभा अत्रे यांनी गायिका म्हणून आणि संगीत विशारद म्हणून लौकिक मिळवला. पुण्याला शिकत असताना त्यांच्या आईवडलांकडे रावसाहेबांचे नेहमी जाणे-येणे असे. डॉ. सत्यरंजन साठे यांनी पुढे परदेशी जाऊन उच्चशिक्षण घेतले. एक विख्यात विधिज्ञ म्हणून नाव मिळवले. जी. व्ही. पंडित यांच्यानंतर १९७६ ते १९९१ अशी पंधरा वर्षे लॉ कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. त्यासाठी मुंबई विद्यापीठातली उत्तम भवितव्य असलेली कायमस्वरूपी नोकरीही त्यांनी सोडली. त्याकाळी लॉ कॉलेजला सरकारी अनुदान नव्हते; त्यामुळे पुण्याला येण्यात पगारकपातही होती. पण साठेंनी नेहमीच पैशापेक्षा चांगल्या कार्याला अधिक महत्त्व दिले. त्या काळात ते संस्थेचे सचिवही होते. लॉ कॉलेजला त्यांनी देशपातळीवर मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. फोर्ड फाउंडेशनची एक मोठी ग्रँट त्यांच्याच प्रयत्नांमुळे लॉ कॉलेजला मिळाली. पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. अनेकदा त्यांना व्याख्यानांसाठी परगावी जावे लागे. अशा वेळी संस्थेची मोटार न वापरता ते नेहमी एसटी बसनेच प्रवास करत. त्यांच्या पत्नी डॉ. विजया साठे नामांकि आहारतज्ज्ञ (डायेटिशियन) होत्या व त्या दोघांचेही रावसाहेबांच्या कुटुंबाबरोबर अखेरपर्यंत अतिशय घरोष्याचे संबंध राहिले. साठेंना घरी सगळे 'बाबा' म्हणत व रावसाहेबांनीही आपल्याला त्याच नावाने हाक मारावी अशी साठेंची इच्छा असायची. पण रावसाहेबांच्या तोंडी एकदा 'साठेसाहेब' बसले ते कायमचेच. रावसाहेब यांच्या ध्यासपर्व या आत्मकथनाला डॉ. साठे यांची विस्तृत आणि मर्मग्राही प्रस्तावना लाभली आहे. " एक माणूस या नात्याने आकाशाला गवसणी घालावी अशी त्यांची उंची होती. प्रसिद्धिपराङ्गमुख आणि विनम्र, तसेच आपल्या अस्तित्वाचा कोठेही फारसा बडेजाव न दाखवणारे असे ते एक निरिच्छ आणि निरपेक्ष व्यक्तिमत्त्व होते. सगळ्यात विशेष म्हणजे ते एक सच्चे मित्र होते," अशा शब्दांत रावसाहेबांनी दिवस काळ्या कोटाचे... १९५