पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करमणुकीच्या कार्यक्रमासाठी मुद्दाम प्रवास करून दुसऱ्या शहरात जाणे ही गोष्ट ६०-६५ वर्षांपूर्वी तशी खूप दुर्मिळ होती. बरीच खटपट करून रात्रीच्या मुक्कामाचीही त्यांना सोय करावी लागली. पण रशियन कलापथक म्हटल्यावर रावसाहेबांना राहवले नाही. बॅले ही रशियन कलासंस्कृतीची सर्वांत मोठी खासियत होती हे ते ऐकून होते व रशियन कलावंतांना प्रत्यक्ष बघण्याची आयुष्यातली ही पहिलीच संधी ते सोडणार नव्हते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाबाबत भ्रमनिरास झाला असला तरी अजूनही रशियाबद्दल रावसाहेबांच्या मनात प्रेम होतेच. पुढे स्टॅलिनचे निधन झाले तेव्हा रावसाहेब रडलेही होते. रशियन बॅलेचा तो कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. नृत्य आणि संगीत यांच्यातला तालमेळ, कलाकारांच्या समूहामधील आश्चर्यकारक परस्परपूरकता, कलावंतांचे रबरासारखे कसेही लवणारे लवचीक शरीर, लयबद्ध हालचाली हे सगळेच डोळे दिपवणारे होते. नृत्य व संगीताचा इतका मोहक आविष्कार त्यांनी पूर्वी कधीही पाहिला नव्हता. बॅले पाहायला आलेला प्रेक्षकवर्गही अगदी निवडक आणि उच्चभ्रू असा होता. मुख्यत: ग्रामीण भागांतून आलेल्या त्यांच्या गटासाठी बॅलेचा, त्या अभिजनवर्गातील प्रेक्षकांबरोबर बसण्याचा आणि एकूणच या कार्यक्रमाला जाण्याचा हा सगळाच अनुभव केवळ अविस्मरणीय असा होता. या अण्णा खाचणेंची एक आठवण मोठी बोलकी आहे. ते म्हणतात : "मी इतिहासाचा विद्यार्थी होतो. माझी एम. ए. ची परीक्षा उद्यावर आली होती. मनावर प्रचंड दडपण होतं. काय वाचावं, किती वाचावं, काही सुचत नव्हतं. मला फ्रेंच क्रांतीच्या इतिहासावरील एक पुस्तक तातडीने हवं होतं. अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. आताच्या आता अप्पा बळवंत चौकात जाऊन पुस्तक खरेदी करणं मला शक्य नव्हतं. सावीस झालो होतो. तेवढ्यात माझ्या खोलीच्या दरवाज्यावर कोणाची तरी थाप पडली. मी दरवाजा उघडला, तर समोर रावसाहेब उभे होते. मला परीक्षेच्या शुभेच्छा देण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. माझ्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहून रावसाहेब म्हणाले, 'काय अडचण आहे अण्णा ?" मी माझी अडचण त्यांना सांगितली. रावसाहेब म्हणाले, 'काळजी करू नका. एका तासात तुम्हांला हवं ते पुस्तक मिळेल. ' कोणतीही, कशाचीही वाट न पाहता एका तासात मला फ्रेंच क्रांतीवरचं पुस्तक रावसाहेबांनी पदरमोड करून विकत आणून दिलं. ते उपयुक्त पुस्तक मला मिळालं; परीक्षेत उत्तीर्ण झालो; त्यांचा मित्र झालो. पन्नास-साठ वर्षांनंतर आजही आमचा स्नेह टिकून आहे." ( प्रेरणापर्व, पृष्ठ १८६-७) अजुनी चालतोची वाट... १९४