पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंधने यायचीच. सगळे शिक्षण फ्रीशिपवर. दादांची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे हातखर्चासाठी असे खिशात कधी पैसे नसायचेच; एक रुपया खर्चायचा म्हटला तरी दोनदा विचार करावा लागे. आता या लॉ कॉलेजात आल्यावर मात्र ही परिस्थिती एकाएकी पालटली. कारण अण्णाभाऊंची वकिली आता चांगली चालू लागली होती व ते भावासाठी सढळ हाताने पैसे पाठवू लागले. कॉलेजातली आणि वसतिगृहातली एकूण सोयही आता चांगली लागली होती. आर्थिकदृष्ट्या बघितले तर हे त्यांच्या विद्यार्थिदशेतले सगळ्यात सुखाचे दिवस होते. कधी नव्हे ते आता रावसाहेब मित्रांबरोबर सिनेमाला जाऊ लागले. 'सबकुछ पुल' असलेला 'गुळाचा गणपती' हा त्यांना त्या काळात विशेष आवडलेला चित्रपट. बलराज साहनी आणि दिलीपकुमार हे त्यांचे आवडते नट. दिलीपकुमारच्या 'देवदास'ने त्यांना भारावून टाकले होते. एकदा तर गमतीगमतीत त्यांनी दुपारी तीनचा, संध्याकाळी सहाचा आणि रात्री नऊचा असे तीन सिनेमे लागोपाठ पाहिले! त्याकाळी कँपात 'वेस्टएंड'ला आणि डेक्कनवर 'अलका'ला इंग्रजी सिनेमे नियमित लागत. तिथे जाऊन अनेक उत्तमोत्तम इंग्रजी सिनेमे रावसाहेबांनी बघितले. मेसमध्ये रोज जेवायला येणारे अण्णा खाचणे नावाचे एक नागपूरचे तरुण त्यांचे मित्र झाले होते. खाचणे सिनेमातले दर्दी होते. सिनेमालाइनीत त्यांच्या बऱ्याच ओळखी होत्या. पुढेमागे दिग्दर्शक बनायचे त्यांचे स्वप्न होते. पुढे ते सिनेमासृष्टीत गेलेही व सहायक दिग्दर्शकपदापर्यंत त्यांनी मजलही गाठली; पण मग भ्रमनिरास होऊन त्यांनी सिनेमासृष्टीला रामराम ठोकला. खाचणेंच्या ओळखीमुळे कॉलेजच्या शेजारीच असलेल्या प्रभात स्टुडियोत जाऊन शुटिंग बघण्याचा रावसाहेबांना एकदा योग आला. ‘नगिना' चित्रपटाचे तिथे शुटिंग चालू होते. दिलीपकुमारचा भाऊ नसीर खान आणि नूतन यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. विशेष म्हणजे स्वत: दिलीपकुमारही त्यावेळी स्टुडियोतच हजर होते. दिलीपकुमार हे त्याकाळी लोकप्रियतेच्या अगदी शिखरावर होते. त्यांचे राजबिंडे रूप व चालण्याबोलण्यातली अदब यांचा रावसाहेबांवर खूपच प्रभाव पडला. त्यांना किंवा कुठल्याच नट- नटीला प्रत्यक्षात बघण्याचा तसेच स्टुडियो वा एखाद्या चित्रपटाचे शुटिंग पाहण्याचा आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग. हा अनुभव रावसाहेबांना खूप रोमांचक वाटला. याच सुमारास रशियाहून एक कलापथक मुंबईत आले असून रशियन बॅलेचा कार्यक्रम सादर करणार आहे अशी बातमी आली. रावसाहेबांनी आपल्या मित्रांसह मुद्दाम मुंबईला जाऊन तो कार्यक्रम बघितला. अशाप्रकारे केवळ एखाद्या दिवस काळ्या कोटाचे... १९३